वाडा : वाडा तालुक्यातील “कोनसई” येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या फटाके (सुतळी बॉम्ब) निर्मिती कारखान्यात भीषण स्फोट होऊन दोन तरुण कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी कारखान्याशी संबंधित चार आरोपींना मध्यरात्री पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोनसई येथे फटाके कारखान्यात झालेल्या स्फोटात भावेश दिलीप वावरे (२१, रा. जामघर) या तरुणाचा तर मोनिका सचिन पडवळे (२८, रा. पालसई) या महिलेचा नाहक बळी गेला आहे. तर अन्य चार गंभीर जखमी महिलांवर वाडा ग्रामीण, खाजगी तसेच भिवंडी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, औद्योगिक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
“लोकसत्ताने” यापूर्वी औद्योगिक क्षेत्र असुरक्षित हे वृत्त प्रसिद्ध केले होते, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. दुर्दैवाने स्फोटाची घटना घडली.घटनेची माहिती मिळताच पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ‘ॲक्शन मोड’मध्ये कारवाई करत मध्यरात्री चार आरोपींना अटक केली.
यामध्ये योगेश दत्तात्रेय मोकाशी (पर्यवेक्षक, रा. कोनसई), वसंत शिवराम नाईक (जागा मालक, रा. कोनसई), कारखाना मालक नरेंद्र रामसुरत सिंग व त्याचा भागीदार श्रीपती बनसी यादव (रा. अंधेरी) अशी अटकेतील आरोपींची नावे असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम मनुष्यवधाचा तसेच विस्फोटक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी एस.एस महेर हे करीत आहेत.
घटना काय आहे..
“कोनसई” ग्रामपंचायत हद्दीत वसंत शिवराम नाईक यांच्या शेतघराच्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये मागील चार महिन्यांपासून हा कारखाना सुरू होता. कोणतीही अधिकृत परवानगी किंवा नामफलक नसताना येथे सुतळी बॉम्ब तयार करण्याचे काम सुरू होते. सुमारे ३५ महिला रोजंदारीवर काम करत असून, घटनेच्या वेळी २८ महिला उपस्थित होत्या. त्यांना कोणतेही सुरक्षा प्रशिक्षण किंवा संरक्षण साधने उपलब्ध नव्हती. व तसे नसताना कामगार ठेवण्यात आले होते. शासकीय नियमांची पायमल्ली करत हा अनधिकृत फटाके कारखाना यंत्रणेच्या नाकावर टिच्चून सुरू होता. विशेष म्हणजे याची स्थानिक पातळीवर पोलीस व प्रशासनाला अजिबात माहिती, कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अन्य ठिकाणी कारखाना
दरम्यान, कोनसई येथे कारखान्यात तयार केलेला फटाक्यांचा माल व साठा (सुतळी बॉम्ब तयार करून) त्यांची “आब्जे” येथे खाजगी वाहनाने बेकायदेशीर वाहतूक केली जात असत. “आब्जे” येथे फटाका साठवणूक तर निचोळे येथे देखील फटाका कारखाना अनधिकृतपणे सुरू असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे या कारखान्यात कच्चा माल, विक्री, पुरवठा कुठून होत होता, यावर सखोल तपास होऊन पायमुळे शोधून काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
घटना कशी घडली आणि त्यानंतरची परिस्थिती –
प्राथमिक माहितीनुसार, कच्च्या स्फोटकांचे क्षमतेपेक्षा जास्त मिश्रण (१६ ते २० किलो असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.) आणि अयोग्य हाताळणी व उन्हाचे वाढलेले तापमान यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ऑपरेटर अर्थात मिश्रण तयार करणारा भावेश वावरे यांनी फटाके (दारूगोळा) याचे मिश्रण तयार करताना काहीतरी विपरीत घडले याची पूर्व कल्पना आल्याने त्यांनी काम करत असलेल्या महिलांना शेड मधून बाहेर पडण्याचा इशारा दिला. महिला देखील अन्य दुसऱ्या शेडजवळ असल्याने त्यांनी दिलेल्या इशाऱ्यावरून पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळली.
मात्र तरीही अनेक महिला या स्फोटाच्या संपर्कात आल्याने त्यांना गंभीर जखमी दुखापत झाली तर भावेश वावरे हा १०० फूट उंच उडून १०० मीटर अंतरावर फेकला गेला. त्याचा मृतदेहाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. यातील एक मोनिका सचिन पडवळे ही महिला गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारांसाठी ठाणे येथे रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अन्य जखमी महिलांमध्ये मोनिका महेंद्र जाधव, (३० वर्षे) कोनसई, जागृती जगदीश गवते (२७ वर्षे रा.जामघर), प्रतिभा प्रताप पवार (३२ वर्षे रा.कोनसई) मोनिका मोहन वारधी (२२ वर्षे रा.कोनसई), अर्चना वसंत मिसार (१९ वर्षे, रा. जामघर), किरकोळ जखमीमध्ये प्रमिला निलेश पडवळे (२५ वर्षे, पालसई), भावना भगवान पवार, १७ वर्षे, रा. जामघर) यांचा समावेश असून त्यांच्यावर वाडा ग्रामीण व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी महिलेवर भिवंडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. या घडलेल्या घटनेबाबत सर्वच स्तरावरून शोक तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांची यंत्रणा अवैद्य व्यवसायाची माहिती घेण्यास फोल ठरली?
पोलिसांची गुप्तहेर यंत्रणा अवैद्य व्यवसायाची माहिती घेण्यास वा काढण्यास पूर्णतः अपयशी (फोल) ठरली असल्याची चर्चा रंगत आहे. तर स्थानिक पोलिसांचे आर्थिक हितसंबंध या प्रकरणाशी जोडले गेले आहेत का? ज्यामुळे अवैद्य व्यवसायाला “अभय” दिले गेले.? दहशतवादी विरोधी पथक नेमके काय काम करत आहे? त्यांची भूमिका स्पष्ट होणे आवश्यक आहे. याचा सखोल तपास करून यात दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे.
आता या घडलेल्या घटनेबाबत व गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे पाहता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची ‘गुन्हे शाखा” कडून सखोल तपासणी करण्याकरिता आदेश देणे अपेक्षित आहे. तरच रॅकेट, धागेदोरे समोर येतील. दरम्यान, पालघर जिल्हाधिकारी व पालघर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख व हे नक्की काय भूमिका घेवून तपास करतात आणि त्यावर पुढील कारवाई होणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकंदरीत प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
