वाडा: मुंबईतील नळबाजार परिसरात एका कुटुंबातील चौघांच्या मृत्यूच्या घटनेनंतर “कलिंगड सेवनामुळे मृत्यू” असा अप्रमाणित निष्कर्ष (तथाकथित) सोशल मीडियावर वेगाने पसरला आणि काही तासांतच राज्यभर भीतीचे वातावरण निर्माण झाले. “कलिंगड खाल्ल्यास जीवाला धोका” अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाल्याने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये कलिंगड विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे.
ग्राहकांच्या मनात निर्माण झालेल्या भीतीमुळे विक्रेत्यांनी कलिंगड विक्री थांबवली असून अनेक ठिकाणी दुकानदारांनी हा मालच बाजूला काढला आहे. काही व्यापाऱ्यांच्या मते, कलिंगड दुकानात ठेवले तरी इतर फळांची विक्रीही घटत असल्याने तोटा टाळण्यासाठी विक्री बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. परिणामी संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून सर्वाधिक फटका थेट शेतकरी वर्गाला बसत आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, पालघर,ववसई या पट्ट्यात कलिंगड हे प्रमुख नगदी पीक मानले जाते. अवघ्या ९० दिवसांत तयार होणाऱ्या या पिकासाठी शेतकऱ्यांना एकरी सुमारे ७० हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. अनुकूल परिस्थितीत १२ ते १५ टन उत्पादन मिळते. शेतकऱ्यांकडून व्यापारी साधारण १० रुपये प्रति किलो दराने खरेदी करतात, तर बाजारात तेच फळ ३० ते ३५ रुपये दराने विकले जाते.
यंदा हंगामाच्या सुरुवातीला काही शेतकऱ्यांना २० ते २३ हजार रुपये प्रति टन दर मिळाला होता; मात्र इराण – अमेरिका युद्धामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती निर्माण होत निर्यात ठप्प झाल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी कमी केली आणि दर कोसळून थेट निम्यावर आले. उन्हाच्या तीव्रतेमुळे तयार माल खराब होण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात विक्री केली. असे कलिंगड उत्पादक शेतकरी मधुकर काशिनाथ सांबरे यांनी सांगितले.त्यातच “कलिंगडामुळे मृत्यू” या अफवेने परिस्थिती आणखी गंभीर केली आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी बाजूने अडकला.
सध्या व्यापाऱ्यांकडील माल साठून राहिला असून अनेक व्यवहार उधारीवर अडकले आहेत. विक्री ठप्प झाल्याने व्यापारी शेतकऱ्यांना ठरलेली रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहेत. परिणामी कर्ज काढून कलिंगड लागवड करणारे कर्जबाजारी शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना वाडा तालुक्यातील कृषीरत्न अनिल नारायण पाटील (रा. सांगे) म्हणाले, “गेल्या चार दशकांत कलिंगडामुळे कोणताही अपाय झाल्याचे किंवा गंभीर आजारी पडल्याचे झाल्याचे कधीही ऐकले नाही. अशा अफवांनी शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकवली आहे.”
कुडूस नाका येथील घाऊक व्यापाऱ्यांनीही या दाव्याला फेटाळून लावले. “घटनेत तथ्य असेल तर शासनाने तातडीने वैज्ञानिक चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडावे,” अशी मागणी केली.
दरम्यान, संबंधित मृत्यू प्रकरणाबाबत अद्याप शवविच्छेदन, फॉरेन्सिक तपास किंवा अन्न व औषध प्रशासनाचा कोणताही अधिकृत अहवाल समोर आलेला नाही. तरीही कलिंगडाला दोष देण्याची घाई झाल्याने समाजमाध्यमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
एका अप्रमाणित बातमीने राज्यातील कोट्यवधींच्या कलिंगड व्यवसायाला जबर धक्का बसला असून, शेतकरी या नगदी पिकापासून दूर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच सहकारी संस्था व बँकांकडून कर्ज घेऊन लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जफेडीचा प्रश्न गंभीर बनला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेवर याचे दूरगामी परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अफवांवर नियंत्रण ठेवावे आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
कोकणानंतर धुळे, जळगाव, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची लागवड केली जाते. त्यामुळे या अफवेचा परिणाम राज्यभर जाणवत असून शेतकरी वर्गात तीव्र चिंतेचे वातावरण आहे. आधीच हवामानातील बदल, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारातील अस्थिरतेशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती “बुडत्याचा पाय खोलात” अशी ठरत असल्याची प्रतिक्रिया अभ्यासक मोहन पाटील यांनी दिली.
