पालघर : पालघर जिल्ह्यात आठ ते दहा हजार एकर क्षेत्रफळावर कलिंगड लागवड केली जात असून लागवडीचे प्रमाण तसेच उत्पादन क्षमता वाढल्याने कलिंगडाचे यंदाच्या हंगामाच्या उत्तरार्धात भाव गडगडल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. त्यामध्ये मुंबईमध्ये कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारित झाल्याने आगामी वर्षी कलिंगडाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर चिंता निर्माण झाली आहे. राज्य शासनाने याबाबत वेळीच उपाय योजना आखण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

पालघर जिल्ह्यात वाडा, विक्रमगड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तर पालघर, डहाणू, जव्हार भागांमध्ये काही प्रमाणात नगदी पिक म्हणून कलिंगड लागवडीला पसंती शेतकरी देत आहेत. वाडा तालुक्यात ४०-५० वर्षांपासून कलिंगड लागवड करणारे अनेक शेतकरी असून काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या बाह्य रंगाचे व आकाराचे कलिंगड तयार करण्याचे यशस्वी प्रयोग केले आहेत.

मोठ्या प्रमाणावर थंडी नसणे व धुक्याचे प्रमाण कमी आहे असे वातावरण कलिंगड लागवड करण्यात योग्य असते महाराष्ट्रात कोकण वगळता इतर ठिकाणी त्या वेळी असे हवामान नसते. म्हणून ऑक्टोबर ते जानेवारी पर्यंत कोकणात पालघर जिल्ह्यातील कलिंगड लागवड करण्यात येते. उत्तर कोकणात तयार होणाऱ्या कलिंगडाला मुंबई ठाण्याच्या बाजारपेठेत मागणी आहे. साधारणपणे भात कापणी झाल्यानंतर संक्रांती पासून होईपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कलिंगडाची अधिक प्रमाणात उत्पादन होत असते. वाडा तालुक्यात पाच हजार एकर व कलिंगड लागवड होत असून विक्रमगड तालुक्यात देखील अलीकडच्या काळात कलिंगड लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

यंदा चे हवामान बघता, ऑक्टोबर पूर्ण थंडीत गेला, त्यावेळेस हवामान व मधमाशीचा अभाव ह्या दोन्ही गोष्टी मुळे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या लागवडी यशस्वी झाल्या नाहीत मात्र नोव्हेंबर व ते डिसेंबर दरम्यान लागवडी अचानक अनपेक्षित वाढ भाव मिळाले ते २२ ते २४ रुपये प्रति किलो पर्यंत वाढले. मात्र रमझान ईद चे दरम्यान कलिंगडाचे भाव सात ते दहा रुपये किलो इतके कमी झाले व ते दरम्यान आलेल्या दराने परत शेतकऱ्यांची निराशा केली.
एकंदरीत हे वर्ष कलिंगड पिकाची विक्री निछाकी व उच्चांकी ठरली.

सुमारे ९० दिवसात तयार होणाऱ्या या पिकासाठी शेतकऱ्यांना एकरी किमान ७० हजार रुपयांचा खर्च येतो. सरासरी एका एकर मधून जिल्ह्यातील शेतकरी १०-१५ टन उत्पादन निघत असून शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत असल्याने त्यांच्यासमोर चिंचेचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांकडून साधारणपणे १० रुपये प्रति किलो खरेदी करून बाजारात ३५- ४० रुपये दराने बाजारात विक्री होत असते.

यामध्येच मुंबई येथे कलिंगड घेऊन चार कुटुंबीयांचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने कलिंगडाच्या खरीदीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. पालघर जिल्ह्यातील कलिंगड उत्पादन हे अखेरच्या टप्प्यात असले तरी धुळे, जळगाव, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर सारख्या जिल्ह्यातील येणाऱ्या कलिंगडाचे प्रमाण लक्षणीय आहे. कलिंगड फळाविषयी सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेली शंका ही आगामी हंगामाकरिता शेतकरी धोक्याची घंटा समजली जात असून याविषयी राज्य शासनाने व विशेषतः कृषी विभागाने नागरिकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकरी व शेतकरी संघटनांनी केली आहे.

उत्पादन वाढीचे करणे

कलिंगडाला चांगला दर मिळत असल्याने कलिंगड लागवड क्षेत्र गेल्या काही वर्षात वाढले आहे. कावड पद्धतीने पाणी वाहून या फळ पिकाला दिले जात असे. मात्र सध्या अनेक शेतकऱ्यांनी ड्रीप व्यवस्था केल्याने उत्पादन वाढल्याचे देखील आले आहे. शिवाय अनेक शेतकरी हे कलिंगडाची तयार रोपांची लागवड करत असून त्यासोबत मल्चिंग व्यवस्था करण्यासाठी आहे एक तरी उत्पादन हे वाढून सुमारे १० टन प्रति एकर होत असल्याचे दिसून आले आहे.

इंजेक्शन दिल्या जाणाऱ्या वृत्तासंदर्भात संशोधन व खुलासा होणे आवश्यक

कलिंगड हे नाशिवंत फळ असून परिपक्व (तयार) झाल्यानंतर ते चार ते पाच दिवस राहू शकते. काही दिवसात त्याचे सेवन न झल्यास ते खराब होत असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत कलिंगडामध्ये गराचा रंग अधिक लालसर करण्यासाठी इंजेक्शनद्वारे डाय टाकली जाते असे समाज माध्यमावर वृत्त पसरविले जात असले तरी त्याचे खंडन येथील शेतकरी करीत आहेत. कलिंगडामध्ये कोणत्याही प्रकारचे छिद्र झाल्यास या नाशिवंत फळांमध्ये जिवणू तयार होऊन त्यामुळे ते फळ खराब होते असे दिसून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अशा कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन दिले जात असल्याच्या वृत्ताचे खंडन करीत आहे.

आपण गेल्या ४० वर्षांपासून कलिंगड लागवड करीत असून कलिंगड मुळे विषबाधा झाल्याचे एकही प्रकार घडल्याचे ऐकिवात नाही. लोकांमध्ये कलिंगडामुळे विषबाधा झाल्याच्या प्रसंगा विषयी निर्माण झालेला समज दूर करण्यासाठी कृषी संशोधन केंद्र, विद्यापीठ तसेच कृषी विभागाने एकत्रित प्रयत्न करून नागरिकांमधील संभ्रम दूर करणे आवश्यक झाले आहे. असेना झाल्यास पुढील वर्षी कलिंगड शेतकऱ्यांना त्याची झळ बसण्याची शक्यता आहे. – कृषी भूषण अनिल नारायण पाटील, सांगे, वाडा