डहाणू : पालघर जिल्ह्यात पुढील काही दिवसांत हवामानात मोठे बदल होणार असून शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, कोसबाड हिल यांच्यातर्फे करण्यात आले आहे. प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात पुढील तीन दिवस उष्ण व दमट वातावरण राहील. त्यानंतर ३ आणि ४ मार्च होळी नंतर तापमानात अधिक वाढ होऊन कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

विस्तारित श्रेणी अंदाजानुसार, कोकण विभागात ५ ते ११ मार्च दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त, तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, उन्हाळी पिके आणि रोपवाटिकांमधील बाष्पीभवनाचा वेग वाढणार असून, पिकांना पाण्याचा ताण बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळी जास्त आर्द्रता आणि दुपारी वाढणारे तापमान यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव जलद गतीने होऊ शकतो.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला

  • उन्हाळी भात व भुईमूग: भात पिकाची पुनर्लागवड होऊन २०-२५ दिवस झाले असल्यास बेणणी करून घ्यावी आणि पाण्याची पातळी २.५ ते ५ सेंमीपर्यंत मर्यादित ठेवावी. भुईमुगाचे पीक ४५ दिवसांपर्यंत तणविरहित ठेवावे.
  • आंबा आणि काजू: उष्णतेमुळे आंबा आणि काजूची फळगळ होण्याची शक्यता आहे. झाडांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा किंवा १५ दिवसांतून एकदा पाणी द्यावे. आंबा फळमाशीच्या नियंत्रणासाठी ‘रक्षक फळमाशी सापळा’ एकरी २ या प्रमाणात लावावा. काजू कलमांच्या आळ्यात पालापाचोळ्याचे आच्छादन करावे.
  • चिकू आणि केळी: चिकू बागेत तण व्यवस्थापन करून आच्छादनाचा वापर करावा. केळीच्या बागेत हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी आणि फुलकिडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करावी.
  • भाजीपाला व फुलशेती: मिरची, टोमॅटो आणि वांगी पिकावर तुडतुडे व फुलकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी. मोगरा आणि सोनचाफा बागेला गरजेनुसार नियमित पाणी द्यावे.