पालघर : पालघर तालुक्यातील केळवे रोड झांझरोळी बंधारा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने या तुडुंब भरलेल्या बंधाऱ्याच्या संरक्षण भिंतीचा काही भाग निखळून पडल्याचे आज सकाळी आढळून आले. जिल्हा प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून परिसरातील आठ गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाटबंधारे विभागाकडून बंधाऱ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आखण्यात येत असून धरणातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परिसरातील १३० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येत आहे.
१९८१ मध्ये या मातीच्या बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली असून ८४० मीटर लांब, १७.८० मीटर उंच बंधाऱ्यांमध्ये सध्या ३.२४२ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे. १९८३-८४ पासून झांझरोळी सह १७ गावांसाठी ०.४५ दशलक्ष घनमीटर क्षमतेने पिण्याच्या पाण्याच्या योजना राबवण्यात येत आहे. ८ जानेवारी २०२२ रोजी या बंधार्याच्या संरक्षण भिंतीच्या काही भागांमध्ये पोकळी निर्माण होऊन त्या ठिकाणाहून पाण्याची गळती सुरु झाली होती. त्यानंतर बंधाऱ्यातील पाणी साठ्याचा निचरा करून नंतर दुरुस्ती करण्यात आली होती.
गेल्या तीन दिवसांपासून पालघर तालुक्याला पावसाने झोडपले असून मध्यरात्रीपासून पालघर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी बंधारामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी भरले असून सांडव्याद्वारे (स्पिलवे) द्वारे २.९५१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग (डिस्चार्ज) असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. आज सकाळी या बंधाऱ्याच्या विसर्ग होण्याच्या लगतच्या भागात भिंतीच्या बाहेरच्या बाजूला असणारे संरक्षक दगड व त्याखालील माती निखळून पडल्याचे आढळून आले. यामुळे बंधाऱ्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून बंधार्यात साचलेल्या पाण्याचा विसर्ग करण्याच्या दृष्टीने उपाय योजना आखल्या जात असल्याचे सांगण्यात आले.
पालघरचे तहसीलदार रमेश शेंडगे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख तसेच जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून परिसरातील पठारी पाडा, मंडळ पाडा, पाटील पाडा, देवशेत, धोंडळ पाडा, झांजरोळी, देवी पाडा तसेच केळवे रोड पश्चिम कडील नदीकाठच्या आठ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या बंधाऱ्याच्या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) तैनात ठेवण्यात आले असून परिस्थीवर जिल्हा प्रशासन देखरेख ठेवत आहे.
जानेवारी २०२२ मध्ये काय झाले होते….
२०२२ च्या पावसाळ्यापासून या धरणातून एका ठिकाणाहून पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आले होते. ही गळती वाढल्याने ४ जानेवारी रोजी धरण सुरक्षारक्षक विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी धरणाची पाहणी करून धरणातील पाण्याची पातळी कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास धरणाच्या ऊर्ध्व बाजूस असलेल्या भरावातील चार मीटर रुंदीचे परिसर ढासळून पोकळी निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. तसेच धरणातील पाणी पातळी तलांक व ढासळलेल्या पोकळीमध्ये असलेल्या पाण्याचे तलांक समान असल्याचे दिसून आले.
धरणातील गळतीचे स्रोत हे विहिरीच्या डाऊन स्ट्रीम हेड रेगुलेटर कॉनदुइट (नळ) परिसरातून होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर धरणाखालील चार गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येऊन राष्ट्रीय आपत्ती बचाव कृती दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. त्याचबरोबर यांनी निर्माण झालेली गळती रोखण्यासाठी आणीबाणी कामांच्या उपाययोजना हाती घेऊन धरणातील विहिरीभोवती तसेच निर्माण झालेल्या पोकळीमध्ये देखील मातीचा भराव टाकण्यात आला आहे.
धरणाच्या विमोचकातून पाणी सोडणे संकोचाचे होत असल्याने धरणाच्या अन्य जागेतून पाणी सोडण्याचा पर्याय अवलंबण्यात आला. धरणातील पाण्याची पातळी कमी करून पिण्यासाठी ०.५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा राखून ठेवून मार्च अखेरीनंतर धरणाच्या गळतीसंदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आले. तोपर्यंत धरणाच्या गळतीच्या भागात करण्यात आलेल्या भरावावर दररोज देखरेख ठेवली गेली होती. धरणाच्या वाढीव सुरक्षिततेबाबत उपाययोजना एप्रिल महिन्यात कामे हाती घेण्यात आली होती.
