पालघर : पालघर येथील नवनिर्मित जिल्हा परिषद इमारतीच्या परिसरात अत्यंत विषारी मानल्या जाणाऱ्या घोणस (Russell’s Viper) जातीच्या सापाची चार पिल्ले आढळून आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आणि कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे जिल्हा संकुल परिसरातील स्वच्छतेचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पालघर जिल्हा मुख्यालयाच्या उभारणीसाठी सिडकोकडून तब्बल १०३ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. ही जागा पूर्वी दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या मालकीची होती. मात्र, अद्यापही या विस्तीर्ण परिसरातील मोठा भूभाग मोकळा असून तिथे मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. या जंगलसदृश जमिनीमुळे आणि पाण्याच्या साठ्यामुळे या परिसरात सरपटणारे प्राणी, हिंस्त्र श्वापदे आणि विषारी सापांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर कार्यालयांच्या शौचालयाच्या ठिकाणी साप आढळल्याच्या घटना घडल्या होत्या.

कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या आवारातच ही घोणस सापाची पिल्ले आढळून आली. सुदैवाने, वेळीच लक्ष गेल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. सर्पमित्रांना पाचारण करून या चारही पिल्लांना सुखरूप पकडून सुरक्षित ठिकाणी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. मात्र, घोणस सापाची पिल्ले आढळल्याचा अर्थ आजूबाजूला मोठी मादी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, ज्यामुळे कर्मचारी वर्गात कमालीची धास्ती पसरली आहे.

सद्यस्थितीत अंधार लवकर पडत असून सायंकाळी उशिरा थांबणार कर्मचाऱ्यांना अंधारातून आपला मार्ग काढावा लागत असतो. शिवाय पाऊस असल्यास काही ठिकाणी पाणी साचत असल्याने अशा ठिकाणाहून मार्ग काढताना सापांची भीती वाटत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात अनेकदा शौचालयात देखील रात्रीच्या वेळी अंधाराचे वातावरण असल्याने कर्मचाऱ्यांना सापाची भीती वाटत असून उंदीर व साप यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना आखण्याची मागणी करण्यात येत आहे.

नागरिकांची मागणी

सिडकोने प्रशासकीय संकुलासाठी १०३ हेक्टरचा एवढा मोठा परिसर विकसित केला असला, तरी आजूबाजूची जंगलसदृश जमीन आणि झाडी तातडीने साफ करणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या दिवसांत हा धोका अधिक वाढतो.

प्रशासनाला तात्काळ उपाययोजनांचे आव्हान

या घटनेनंतर जिल्हा परिषद आणि सिडको प्रशासनाने तात्काळ दखल घेणे गरजेचे बनले आहे. डेअरी डेव्हलपमेंटच्या या जुन्या आणि आता जंगल बनलेल्या जागेची नियमित साफसफाई करावी, तसेच इमारतीच्या आजूबाजूचा परिसर सुरक्षित करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

उंदीर आणि साप

जिल्हा मुख्यालय संकुलात असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसेच प्रशासकीय इमारतींमधील कार्यालयांमध्ये उंदरांचा मुक्त वावर असून अनेक कार्यालयांमध्ये वातानुकूलित यंत्रणेमधून उंदीर डोकावताना दिसून येतात. मुळातच पूर्वीच्या झाडे झुडप असणाऱ्या परिसरात असणाऱ्या सापांना या कार्यालयात सहजगत खाद्य उपलब्ध होत असून त्यामुळे या सर्व कार्यालयांमध्ये सापांचा वावर दिसून येत आहे.