पालघर : पालघर जिल्ह्यात तलासरी- अच्छाड दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या पट्ट्यात, डहाणू- चारोटी, बोईसर- चिल्हार तसेच पालघर- माहीम दरम्यानच्या भागांमध्ये रस्त्यावर असणाऱ्या मोकाट गुरांमुळे अनेक अपघात होत असून पुढील आठवड्यात अशा मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याचे जिल्हा परिषदेने पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने आखणी केली आहे. या भागातील मोकाट व बेवारस गुरांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी जिल्ह्यात तसेच जिल्हा बाहेरील गोशाळांमध्ये करण्याचे योजिले आहे.
रस्त्यावर बसून राहणारे गुरांच्या कळपामुळे दुचाकी तसेच चार चाकी वाहनांचे अनेक अपघात घडले आहेत. यामध्ये गुरांना इजा होण्यासोबत अनेक वाहन चालकांचा मृत्यू होणे तर इतर जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावर असणाऱ्या गुर सहजपणे निदर्शनास येण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही भागात गुरांच्या शिंगाना रेडियम लावण्याची योजना सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आली होती. तरी देखील मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांमध्ये अपघात सातत्याने घडत आहे. गेल्या काही महिन्यात डहाणू परिसरात झालेल्या अपघातांची संख्या लक्षणीय असल्याने या विषयी तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला ठाणे- मुंबई तसेच जिल्ह्यातील गोशाळा संस्थांचे पदाधिकारी, गोरक्ष व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.
शासनातर्फे गोशाळांमधील दोन वर्षावरील गाईंच्या संगोपनासाठी देण्यात येणारे ५० रुपये प्रति गाय इतके अनुदान खूपच तुटपुंज असल्याचे नमूद करत हे अनुदान गोशाळेतील संपूर्ण गोवंशला मिळावे, दोन वर्षाखालील वासरांना देखील अनुदान मिळावे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणे तसेच गुरुचरण जमिनीवर शासनाने शेड उभारणीसाठी व गोवंश संवर्धनासाठी शासकीय निधी तसेच सामाजिक दायित्व निधीची उपलब्धता करून द्यावी असे विचार या बैठकी मांडण्यात आले.
या विषयी मनोज रानडे यांनी मार्गदर्शन करताना अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखण्यात स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सेवाभावी संस्थांची योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले. अपघातामध्ये जखमी झालेल्या गोवंश वर पशुसंवर्धन विभागाच्या वैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने उपचार करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील गाई- म्हशींचे संख्या वाढवण्याच्या दृष्टीने प्रति पशुधन ४० हजार रुपयांचे अनुदान देण्याचे असून यासाठी जिल्हा परिषदेने ४० लाख रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात विविध ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या गुरचरण जमिनी च्या ठिकाणी गोशाळा उभारणे, गोबर खताच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रकल्प उभारणे, गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनांना विशिष्ट रंग अनिवार्य करणे तसेच अपघातग्रस्त गोवंशाना दुखापती दरम्यान उपचार करण्यासाठी पशु दवाखाने, पशु हॉस्पिटल उभारण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली.
मोकाट गुरांवर कारवाई करण्यात पालघर जिल्ह्यात काही विशिष्ट ठिकाणी मोकाट गुरांचा वावर असून त्यावर ७ सप्टेंबर नंतर कारवाई करण्याचे जिल्हा परिषदेने पशुवैद्यकीय विभाग, पोलीस व इतर सेवाभावी संस्थांच्या मदतीने योजिले आहे. संबंधित गोवंश मालकाने आपल्या मालकीच्या पशूना
गोठ्यात बांधून ठेवावे अथवा उपद्रव होणार नाही या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात बेवारस व मोकाट गुरांना पकडून त्यांची पालघर, बोईस, अच्छाड, वापी व राज्यात अन्य ठिकाणी हलवण्यात येईल असे जिल्हा परिषदेतर्फे इशारा देण्यात आला आहे. या कारवाईच्या अनुषंगाने संबंधित गोवंश मालकांनी सतर्कता बाळगावी व खबरदारी घ्यावी असेही जिल्हा परिषदेने प्रसिद्धपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
