पालघर: पालघर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शाळेतील शिक्षकांची पद रिक्त असल्याने समस्या निर्माण झाली होती. मात्र गेल्या महिन्यात ८१८ शिक्षक पदांवर नेमणुका केल्यानंतर पुन्हा नव्याने २९७ शिक्षकांच्या पदांकरिता उमेदवार उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील रिक्त असणाऱ्या शिक्षकांच्या जागा एकंदर शिक्षकांच्या पदाच्या १० टक्क्यांपेक्षा कमी होणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडे शिक्षकांना बारकाईने लक्ष देणे शक्य होणार असून शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.
पालघर जिल्ह्यात एकूण ३३२८ शाळांपैकी जिल्हा परिषद अंतर्गत २१२९ शाळा कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुमारे सात हजार शिक्षकांच्या पदांना मंजुरी आहे. शासनाने कंत्राटी शिक्षकांच्या भरतीला मंजुरी दिल्यानंतर ४९६ कंत्राटी शिक्षक कार्यरत असताना देखील जून महिन्याच्या अखेरीस शिक्षकांची सुमारे १२०० रिक्त होती.
शासनाने शिक्षक भरतीला दिलेल्या मंजुरीनुसार जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या मराठी शाळांसाठी १२९४ तर उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी ३६ पद भरण्याची अनुमती देण्यात आली होती. पवित्र पोर्टल च्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात त्यापैकी मराठी माध्यमांसाठी ८०४ तर उर्दू माध्यमासाठी १४ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना महिन्याभराच्या कालावधीत रुजू होण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
याच प्राथमिक शिक्षक भरती प्रक्रियेत पहिल्या फेरीच्या पुरवणी यादीत पालघर जिल्ह्याला नव्याने २९७ प्राथमिक शिक्षक मिळणार असून त्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी करिता २४७ शिक्षक, मराठी भाषेसाठी ४७ शिक्षक तर विज्ञान गणित विषयासाठी तीन व उर्दू माध्यमासाठी दोन शिक्षकांची समुपदेशनाद्वारे भरती पुढील आठवड्यात होणार आहे. यामुळे बंदरपट्टीच्या भागात शून्य शिक्षकी, एक शिक्षकी तसेच जास्ती पण असणाऱ्या शाळांमध्ये मुबलक प्रमाणात शिक्षकांची उपलब्धता होणार आहे.
या दोन्ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याला सुमारे १३०० नवीन प्राथमिक शिक्षक उपलब्ध होणार असून त्यामुळे रिक्त असणाऱ्या शिक्षकांच्या पदाचे प्रमाण एकंदर शिक्षकांच्या तुलने १० टक्के पेक्षा कमी होईल अशी अपेक्षा आहे. यामुळे प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांकडे अधिक काटेकोरपणे लक्ष देऊन अशा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया अधिक मजबूत होण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी व्यक्त केली आहे.
कंत्राटी शिक्षकांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न
जिल्ह्यात ४५०-४९० कंत्राटी शिक्षक कार्यरत असून त्यांना गेल्या सव्वा ते दीड वर्षापासून २० हजार रुपयांचे मानधन दिले जात असे. शासनाच्या १२ फेब्रुवारी २०२५ च्या निर्णयानुसार या नेमणुका झाले असून त्यांच्या भरतीच्या वेळी ही कंत्राटी भरती कायमस्वरूपी शिक्षकांच्या नेमणुकीपर्यंतच कार्यरत राहील अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. तरी देखील शासनाचे या संदर्भातील पुढील आदेश येईपर्यंत अशा कंत्राटी शिक्षकांना जिल्ह्यातील शाळांमध्ये रिक्त असणाऱ्या जागां मध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची भूमिका घेण्यास जिल्हा परिषद विचाराधीन असल्याचे समजते. दरम्यान पालघर जिल्ह्यात कंत्राटी सेवेमध्ये असणाऱ्या ५० ते १०० शिक्षकांची जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये सरळ सेवेमध्ये संधी मिळाली असून शिक्षकांची भरती प्रक्रिये पूर्ण झाल्यानंतर या संदर्भात अधिक स्पष्टता येईल असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
टीईटी करिता प्रशिक्षण वर्ग
शिक्षकांची भरती टीईटी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे होत असल्याने कंत्राटी सेवेत असणारे शिक्षक तसेच इतर शिक्षकांना या भरती प्रक्रियेत संधी मिळावी या दृष्टीने आकांक्षित भागांमध्ये शिक्षक होऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेतर्फे देण्यात आले.
