पालघर: डहाणू तालुक्यात असणाऱ्या वाणगाव ग्रामपंचायत हद्दीमधील ७८ कुटुंबाला शौचालय उभारणी केल्याबद्दल प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. मात्र त्यापैकी अनेक लाभार्थी हे सधन कुटुंबातील असल्याचे दिसून आले आहे. या गैरप्रकाराबाबत पंचायत समितीमार्फत प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करण्यात येणार आहे.
वाणगाव ग्रामपंचायत हद्दीमधील ७८ कुटुंबाने २०२१-२२ या आर्थिक वर्षांमध्ये शौचालयाची उभारणी केली होती. जिओ टॅगिंग करून आवश्यक कागदपत्र व शौचालयाचे छायाचित्र संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले होते. लाभार्थीना शासकीय अनुदान मिळावे म्हणून प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र निधीची उपलब्धता नसल्याने प्रत्यक्षात अनुदान मिळण्यास विलंब झाला. दरम्यान, या ग्रामपंचायतचा पदभार नव्या ग्रामसेवकाने स्वीकारल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी तसेच माजी पंचायत समिती सदस्यांनी त्यांची दिशाभूल करून तसेच त्यांच्यावर दबाव आणून प्रस्तावावर स्वाक्षऱ्या घेतल्या आणि लाभार्थीना अनुदान वितरित केल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले.
विशेष म्हणजे अनुदान प्राप्त केलेल्या या यादीमध्ये माजी सरपंच, पंचायत समिती सदस्य, घरपट्टी नसलेले तसेच अठरा वर्षे पूर्ण नसलेले लाभार्थी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सधन कुटुंबातील काही व्यक्ती व एकाच कुटुंबातील दोन- तीन लाभार्थी यांचा या यादीत समावेश असल्याचे दिसून आले आहे. ही यादी एका माजी पंचायत समिती सदस्याने डहाणू पंचायत समिती कार्यालयात सादर केल्याची माहितीदेखील पुढे आली आहे.
या प्रकाराबाबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकज कोरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. जिल्हा परिषदेकडे दाखल केलेल्या तक्रारी पंचायत समितीकडे आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, तसेच प्रत्येक लाभार्थ्यांचे शौचालयाची व त्यांच्या कौटुंबिक व आर्थिक पार्श्वभूमीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यात येईल, असे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पल्लवी सास्ते यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
राजकीय वरदहस्त?
ग्रामपंचायत स्तरावर काही मर्जीतील सधन कुटुंबांना शौचालय अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी काही स्थानीय राजकीय मंडळींचा हा प्रयत्न असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, भूमिहीन अशा लाभार्थीच्या यादीत सधन कुटुंबातील ठाकूर, पटेल व इतर काही व्यक्तींची नावे समाविष्ट केल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येते.