पालघर: पालघर जिल्ह्याची १० हजार हेक्टर क्षेत्रामध्ये बांबू लागवडीची क्षमता असून यंदा ५० लाख रोपांची लागवड जिल्ह्यात होऊ शकते. इतक्या मोठ्या प्रमाणात बांबू तयार झाल्यास त्याचा वापर करण्यासाठी डहाणू औष्णिक विद्युत केंद्र ही एकमेव जागा उपयुक्त आहे. यामुळे डहाणू औष्णिक विद्युत केंद्र हे पहिले बायोमासवर चालणारे केंद्र आपण करून दाखवू शकतो असा आशावाद पाशा पटेल यांनी बांबू लागवडीच्या आढावा बैठकीत व्यक्त केला.
दिवसेंदिवस वातावरणातील तापमान वाढत असून तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड कमी करण्यासाठी ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या बांबूची लागवड करणे आवश्यक असल्याचे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले. बांबू लागवडी बाबतची आढावा बैठक २ जून रोजी आयोजित करण्यात आली होती. पालघर जिल्ह्यातील बांबू लागवडीचा आढावा पालकमंत्री गणेश नाईक, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
जिल्ह्यामध्ये १० हजार हेक्टर क्षेत्रामध्ये बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट असून दोन हजार ५०० हेक्टरवर बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये एक किलो दगडी कोळसा वापरून जेवढी वीज निर्माण केली जाते तेवढीच वीज एक किलो बांबू वापरून मिळते. कोळसा जळल्यामुळे प्रदूषणात वाढ होते पण बांबू पासून प्रदूषण होत नाही त्यामुळे औष्णिक विद्युत प्रकल्पात दगडी कोळशाचा वापर न करता बांबूचा वापर करावा असे आवाहन पाशा पटेल यांनी यावेळी केले.
जिल्ह्यातील डहाणू औष्णिक विद्युत केंद्र हे एक कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प आहे. औष्णिक वीजनिर्मितील केंद्रांतील प्रदूषणकारी कोळशाला बांबू हाच पर्याय असून राज्य सरकारने २४ औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये १० टक्के बांबू वापरण्यास परवानगी दिली आहे.
पालघर जिल्ह्यात राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक वनक्षेत्र असून त्याचा वापर योग्य पद्धतीने केल्यास प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्रात पालघर एक नंबरचा जिल्हा होऊ शकेल. यंदा ५० लाख बांबूच्या रोपांची लागवड जिल्ह्यात होऊ शकते. वर्षाला सर्वाधिक उत्पन्न देऊ शकणारे बांबू लागवड मोठ्या प्रमाणात झाली तर त्याचा वापर डहाणू येथील औष्णिक विद्युत केंद्रात होऊ शकतो असे झाल्यास डहाणू हे पहिले बायोमास वर चालणारे केंद्र आपण करून दाखवू शकतो. याची सुरुवात ५ जून रोजी पर्यावरण दिनी व्हावी असा मानस पाशा पटेल यांनी आढावा बैठकी अंति व्यक्त केला.
प्रदूषण रोखण्यासाठी व उत्पन्नाकरिता संधी
औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून निघणारा कार्बन डायऑक्साइड हवेत सोडला जातो. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी कोळशाऐवजी इंधन म्हणून बांबूचा वापर शक्य आहे. पर्यावरण संवर्धक बांबू ऑक्सिजनचा मोठा स्रोत असून, तो हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो. त्यामुळे बांबूची पर्याप्त लागवड होणे आवश्यक असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना एकरी दोन लाखांचे उत्पन्नाचे साधनही उपलब्ध होईल, असे पाशा पटेल यांनी सांगितले.
मानव जात जिवंत ठेवायची असेल तर जमिनीच्या पोटातले कोळसा, पेट्रोल, डिझेल या घटकाचा वापर थांबवून त्याऐवजी जमिनीच्या पाठीवरील पर्यावरणपूरक बांबू लागवड करून पर्यावरणाचे संरक्षण करावे.- पाशा पटेल, राज्य कृषी मूल्य आयोग अध्यक्ष