पालघर: प्राधान्यक्रमाने अकरावीत प्रवेश मिळावा यासाठी ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांनी सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) प्रवेश घेतला आहे. मात्र या ऑनलाइन परीक्षेत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या परीक्षेबाबत सावळागोंधळ असल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.

आपल्या आवडीच्या महाविद्यालयांमध्ये व शाखांमध्ये प्राधान्यक्रमाने प्रवेश मिळावा यासाठी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मोठय़ा संख्येने विद्यार्थ्यांनीही सामायिक प्रवेश परीक्षेसाठी प्रवेश घेतला आहे. विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा ऐच्छिक आहे. मात्र प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अवलंब केला आहे. मात्र ग्रामीण भागात या परीक्षेबाबत अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत.

दहावीचा निकाल लागल्यानंतर प्राधान्यक्रमाच्या अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाने सामायिक प्रवेश परीक्षेचा अवलंब केला असला तरी पालघर जिल्ह्यतील वाडा, मोखाडा, विक्रमगड, जव्हार या भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटअभावी ही परीक्षा देता येईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचबरोबरीने या परीक्षेसाठी कोणता अभ्यासक्रम अपेक्षित आहे, हेही विद्यार्थ्यांना समजले नसल्यामुळे त्यांच्यासमोर या परीक्षेसंदर्भाच्या अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

प्रवेश परीक्षेसंदर्भात राज्य शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचना पालघर जिल्हा शिक्षण विभागाने शाळांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवल्या असल्या तरी ग्रामीणबहुल भागात विद्यार्थ्यांपर्यंत याबाबतच्या सूचना अजूनपर्यंत पोहोचल्या नसल्याचे दिसून येते. शाळांपासून विद्यार्थी लांब पल्लय़ावर राहत असल्याने त्यांच्यापर्यंत सामायिक प्रवेश परीक्षेसंदर्भातील या मार्गदर्शक सूचना पोहोचवणे शक्य नसल्याचे काही शाळांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसह शाळांमध्ये संभ्रम कायम आहे.

पालघर जिल्ह्यतील मोखाडा, वाडा, विक्रमगड, जव्हार या भागांमध्ये इंटरनेटचा मोठा अभाव आहे. इंटरनेटअभावी काही विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी प्रवेश घेता आलेला नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे, त्यांना इंटरनेट उपलब्ध नसल्याने ही परीक्षा देता येईल का, असा संभ्रम निर्माण झाला

आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अडचणी निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने पर्याय शोधावा, अशी मागणी यानिमित्ताने समोर येत आहे.

इंटरनेट नसलेल्या भागांमध्ये तालुका स्तरावर विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही काही विद्यार्थ्यांनी केली आहे. याचबरोबरीने या परीक्षेसाठी दहावीच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर प्रश्न विचारले जाणार असले तरी त्याचे स्वरूप काय असेल व कोणत्या विषयांवर आधारित असेल हेही शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या माहितीकरिता उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांमार्फत समोर येत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या समस्या जाणून घेत शिक्षण विभागासोबत चर्चा करून इतर व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहोत, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी सांगितले.

सीईटी दिलेले बहुसंख्य विद्यार्थी उत्तीर्ण होणार असल्याने ज्यांनी ही परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन प्रवेशाचा प्रश्न उपस्थित होईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटअभावी परीक्षेचा प्रश्न असेल तर त्यासाठी त्यांना पर्याय उपलब्ध करून द्यायला हवा.

-डॉ.किरण सावे,  प्राचार्य, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा परीक्षेचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी शिक्षणमंत्री यांच्याकडे करतो व विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतो.

-ज्ञानेश्वर सांबरे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती,जि.प.पालघर