scorecardresearch

मिरची उत्पादक संकटात

वातावरणातील बदल तसेच मिरची पिकावर झालेल्या काळय़ा थ्रीप व इतर रोगांच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सुमारे अडीच ते तीन हजार एकरवरील मिरची उत्पादक संकटात सापडले आहेत.

रोगांचा प्रादुर्भाव; जूनपर्यंत असलेला हंगाम मार्चमध्येच संपुष्टात

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : वातावरणातील बदल तसेच मिरची पिकावर झालेल्या काळय़ा थ्रीप व इतर रोगांच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सुमारे अडीच ते तीन हजार एकरवरील मिरची उत्पादक संकटात सापडले आहेत. जून महिन्यापर्यंत सुरू राहणाऱ्या मिरचीचे हंगाम यंदा मार्च महिन्यातच संपुष्टात आले असून मिरची उत्पादकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

डहाणू तालुक्यातील सुमारे पावणेदोन हजार एकर मिरची लागवडीसह जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या भागामध्ये मिरचीची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात येत असून जानेवारी महिन्यात वातावरणातील बदल, अवेळी पावसामुळे मिरचीवर काळय़ा थ्रीप, माईट व सफेद पाखरू या कीटकांचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर मिरची उत्पादकांनी कीटकनाशकांची फवारणी सुरू केली असली तरीही वाढलेली उष्णता तसेच वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे अनेक मिरची बागा या कीटकांच्या प्रादुर्भावाने ग्रस्त झाल्या आहेत.

वातावरणातील उष्णता वाढीबरोबर मिरची उत्पादन वाढत असते. मात्र काळय़ा थ्रीप कीटक फुलाच्या माध्यमातून मिरचीच्या झाडामध्ये प्रवेश करून झाडाचा उत्पादनाला बाधित करत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही आठवडय़ांपासून मिरची उत्पादक या विरुद्ध दर तिसऱ्या दिवशी फवारणी करत असले तरीही त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. इतर वेळी या हंगामात मिरचीची विक्रमी आवक होत असताना यंदा अनेक शेतकऱ्यांचे जेमतेम ४० टक्के उत्पादन झाले असताना मिरची लागवड निकामी ठरली आहे.

डहाणू तालुक्यात मोठय़ा प्रमाणात तिखट मिरची, सिमला (ढोबळी) मिरची, आचारी मिरची व इतर जातीच्या मिरचींची लागवड केली जाते. तिखट मिरचीचे उत्पादन एकरी २० ते २२ टन तर इतर प्रकारांचे ३५ ते ४० टन इतके असताना यंदाच्या हंगामात जेमतेम ३५ ते ४० टक्के मिरची उत्पादन झाल्याचे वंगण येथील मिरची शेतकरी विवेक पाटील यांनी लोकसत्ताला सांगितले. बदलत्या वातावरणामुळे मोठय़ा प्रमाणात औषध फवारणी केल्यानंतरदेखील कीटक औषधाला दाद देत नसल्याचे तसेच फळगळ होत राहिल्याने मिरची शेती संकटात आली आहे.

डहाणू तालुक्यासह पालघर जिल्ह्यात अन्य ठिकाणी होणाऱ्या या कीटकांचा प्रादुर्भाव मिरची उत्पादक सामोरे जाताना त्रस्त झाले आहेत. जानेवारीपासून कीटकांचा शिरकाव झाला असून गेल्या काही वर्षांत इतक्या मोठय़ा प्रमाणात कीटकांचा प्रादुर्भाव प्रथम झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे मिरचीचे विक्री दर दुपटीने वाढले असले तरीही उत्पादन अत्यंत मर्यादित स्वरूपात होत असल्याचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मिरचीवरील कीटक प्रादुर्भावामागील कारणे

  •  वर्षांनुवर्षे एकच पीक घेऊन (मोनॉक्रपिग) पीक फेरपालट होत नाही
  •  वातावरणातील बदल : अवेळी पाऊस, कडक उन्हाळा, ढगाळ वातावरणाचा
  • समुद्र जवळ असल्याने हवेतील आद्र्रता : ८०-९० टक्के आद्र्रता कीटकांसाठी पोषक ठरते
  • रासायनिक औषधांचा बेसुमार वापर
  • एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनाची पद्धत अवलंबली गेली नाही; जैविक व रासायनिक कीटकनाशकांचा सुवर्णमध्य साधणे आवश्यक
  • सामूहिक उपचार पद्धती अवलंबिली जात नाही

डहाणू तालुक्यात मिरची लागवड मोठय़ा प्रमाणात होत असून यंदा काळय़ा थ्रीप कीटकांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात झाल्याचे दिसून आले आहे. कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने कीटकनाशकांची शेतकरी फवारणी करीत आहेत.- संतोष पवार, तालुका कृषी अधिकारी, डहाणू

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Peppergrowers in crisis disease outbreaks season ending amy

ताज्या बातम्या