पालघर : मोखाडा तालुक्यातील आठ शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक बटाटा लागवडीचा पथदर्शी उपक्रमशील प्रयोग केला आहे. पहिल्यांदाच दोन एकरांत हा पथदर्शी उपक्रम राबविला आहे. आरोहण संस्थेने या उपक्रमात महत्त्वाचे योगदान दिले आहे. जव्हार, मोखाडा तालुक्यात बटाटा पिकासाठी पोषक वातावरण आहे. या लागवडीमुळे पिकाचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या स्रोतासाठी चांगलाच फायदा होणार आहे. हिवाळय़ात या डोंगराळ भागात जास्त दिवस थंडी असते. बटाटा पिकासाठी हे हवामान पूरक आहे. तसेच मध्यम प्रतीची, खोलीची, भुसभुशीत, कसदार, उत्तम निचरा होणारी जमीन येथे आहे. डहाणूच्या कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भरत कुशारे यांनी शेतकऱ्यांना बटाटा लागवडीविषयी माहिती देत, मार्गदर्शन केले. त्याआधारे आडोशी आणि शिरसगाव येथील आठ आदिवासी शेतकऱ्यांनी डिसेंबर ते जानेवारी काळात दोन एकर क्षेत्रांत बटाटा लागवड सुरू केली. निम्म्या शेतकऱ्यांनी गादीवाफा आणि सरी वरंबा पद्धत वापरली.
बटाटा पीक ९० दिवसांच्या कालावधीचे पीक आहे. लागवडीसाठी बटाटय़ाचे कंद ३० ते ५० ग्रॅम वजनाचे असावे लागते. प्रति हेक्टरी साधारणत: २५ क्विंटल बियाणे लागते. लागवडीचा हंगाम, जमीन, पिकाची जात आदींवर उत्पादन अवलंबून असून लवकर येणाऱ्या जातीचे सरासरी उत्पादन हेक्टरी २० टन येते. चांगल्या प्रतीच्या बटाटय़ाला बाजारात लिलाव प्रक्रियेत चांगला दर मिळतो.




शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी आरोहण संस्था सर्वतोपरी साहाय्य करीत आहे. नव्या पीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांसाठी चांगला आर्थिक स्रोत निर्माण होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.
– अमित नारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोहण संस्था
बटाटा पीक नव्याने रुजविण्यात आरोहण संस्थेचे योगदान महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी या पिकाचा नक्कीच फायदा होईल. बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहेच.
– डॉ. विलास जाधव, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड