आदिवासी बांधवांकडून डोंगरात वृक्ष लागवड ; जंगलांचे पुनर्जीवन करण्याचा ग्रामसभांमध्ये निर्धार

डोंगर जमिनीत खड्डा करून त्यामध्ये गोळा केलेल्या चार हजारपेक्षा अधिक बियांची लागवड केली.

( प्रतिनिधिक छायाचित्र )

पालघर : ‘चैत अन् वैशाखात लोकां रानात पकी हिंडली. फार वायवायल्या बई गोळाटेल (वेगवेगळय़ा बिया गोळा केल्या), अन् आथा ज्येठ लागेल तसां.. बाया-दादे, पोशां, बांडगे, डवर-डोसल्या (स्त्री-पुरुष, पोरं, तरुण, वृद्ध-वृद्धा) आख्यांनी रानात जान् हजारो बिया पिरेल..’ अशी आदिवासी बोलीभाषा बोलत आदिवासी बांधवांनी पालघर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागांत उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण केले.

एक नाय दोन नाय, दहा गावांत – लोकां ग्रामसभेलं दरमहा बसत अन् चावळत, हो जंगल आपलाच, आथा फारेष्टराचा काम नाय रहला, आथा आपलेच ठरवू अन् वाढवू, आखा रान वळवू, आपले पोशालं आज्या सारखा जंगल भेटला पाहजं.. ग्रामसभेत ठरला की फायनलच जसा, घरन् घरातून एक मानूस निघायचाच, मंगलवार जंगलवार करायचा..

वयम् संस्थेच्या प्रेरणेने जव्हार तालुक्यातील दहा गावांनी आपल्या भागातील जंगलांचे पुनर्जीवन करण्याचा निर्धार ग्रामसभांमध्ये केला. जंगलातील वृक्ष नसलेल्या तसेच आपली देखरेख राहील अशा ठिकाणी गावकऱ्यांनी एकत्रितपणे ही मोहीम हाती घेतली. जंगलात कंटूर रेषेचा अभ्यास करून त्या रेषेत डोंगर जमिनीत खड्डा करून त्यामध्ये गोळा केलेल्या चार हजारपेक्षा अधिक बियांची लागवड केली. प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याने या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमात १५० पेक्षा अधिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

उपक्रमात सहभागी गावे
पालघर जिल्हा- देवीचा पाडा, खैरमाळ, बेजपाडा, लोहंबरपाडा, डोयापाडा.
नाशिक जिल्हा (त्र्यंबक तालुका)- सादडपाना, काथवडपाडा, बोरमाळ, रानपाडा, गौळपाडा

कंटूर मार्करचा वापर
कंटूर मार्कर स्थानिक पातळीवर तयार करणे व त्याचा वापर करून कंटूर रेषा आखण्याचे प्रशिक्षण सगळय़ा गावांमध्ये देण्यात आले. त्याप्रमाणे ठरवलेल्या क्षेत्रात लोकांनी कंटूर रेषा आखल्या आणि त्या रेषांवर बिया लावल्या.

स्थानिक प्रजातींच्या बिया
स्थानीय प्रजातींच्या बिया : बेहडा, हिरडा, धामोडा, कहांडोळ, ऐन, पळस, टेटव, चिंच, गुंज, मुरूडशेंग, बहावा, कुडी व इतर.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Planting trees in the mountains by tribal brothers determination in villages to revive forests amy

Next Story
जिल्ह्यत दहा युरिया वितरकांवर कारवाई ; राखीव साठा शेतकऱ्यांसाठी खुला
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी