पालघर : पालघर जिल्ह्यातील ३०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. मतदान प्रक्रियेला अवघे चार दिवस शिल्लक असून मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस करडी नजर ठेवून आहेत. मतदानाच्या दिवशी व त्याआधी मोठा पोलीस फौजफाटा जिल्ह्यातील या ग्रामपंचायतींमध्ये तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसांनी दिली आहे.

ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान तसेच इतर वेळी अनुचित प्रकार व गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. कोणीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सक्त सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. त्यानुसार   गावागावांमध्ये सुरू असलेल्या हालचालींची इत्थंभूत माहिती पोलीस आपल्या सूत्रांकडून गोळा करताना दिसत आहेत.

मतदानाच्या दिवशी पालघर जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकडय़ांना पालघर जिल्ह्यात पाचारण करण्यात आलेले आहे. यांच्यासह जिल्ह्यातील ४५० गृहरक्षक दलाचे जवान पोलिसांसह मतदानाच्या दिवशी तैनात ठेवण्यात येणार आहेत. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक असलेल्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये जिल्ह्यातील चार उपविभागीय अधिकारी लक्ष ठेवून असणार आहेत. दहा पोलीस निरीक्षक, १०० पेक्षा जास्त साहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह १८८२ पोलीस कर्मचारी यांची पथके तयार करून मतदानाच्या दिवशी विविध ग्रामपंचायतींमध्ये बंदोबस्तासाठी ठेवले जाणार आहेत. गस्ती व इतर कामांसाठी ९० पेक्षा जास्त वाहने पोलीस मतदानाच्या दिवशी वापरणार आहेत. याआधी झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकीपेक्षाही जास्त पोलीस बंदोबस्त १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी वापरला जात आहे.