scorecardresearch

पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी व सीमा तपासणी नाका परिसरात महामार्ग पोलिसांकडून झालेल्या हप्तेवसुलीची दखल महामार्गाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली गेली आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

हप्तेवसुली प्रकरण भोवल्याची चर्चा

पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी व सीमा तपासणी नाका परिसरात महामार्ग पोलिसांकडून झालेल्या हप्तेवसुलीची दखल महामार्गाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली गेली आहे. चारोटी टॅपचे (महामार्ग पोलीस ठाणे) सहायक पोलीस अधिकारी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ही बदली प्रशासकीय असल्याचे कारण पोलीस प्रशासन देत आहे, तर हप्तेवसुली प्रकरण भोवल्याने ही बदली केल्याची चर्चा  आहे.

महामार्गावर काही महिन्यांपूर्वी सर्वसामान्य तपासणीच्या नावाखाली महाराष्ट्रातून गुजरातकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हलर बसेस व इतर खासगी लहान प्रवासी वाहनांची अडवणूक केली जात होती. वाहनांच्या चालकांना अवैध टोकन देऊन दरमहा दोनशे ते पाचशे रुपये हप्तेवसुली केली जात असल्याचे प्रकार उजेडात आले होते.   बऱ्याच काळापासून हा प्रकार सुरू असल्याने तपासणीच्या नावाखाली आतापर्यंत लाखो रुपयांची हप्तेवसुली झाल्याचे सांगितले जात आहे. ‘लोकसत्ता’ ने हे प्रकरण उजेडात आणले होते. मात्र या प्रकरणाची माहिती नसल्याचे महामार्गच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सांगून या प्रकरणात लक्ष घालून तपासाचे व चौकशीचे आश्वासन त्यांनी दिले होते.

हप्तेवसुली प्रकरणात महामार्गाच्या तीन टॅपच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी जातीने लक्ष घालून खात्यांतर्गत तपास सुरू केले. या चौकशीत त्यांनी विविध पैलू तपासले, तसेच विविध ठिकाणी आलेल्या बातम्यांचे संकलन करून त्यांनी या प्रकरणात खोलवर तपास सुरू केला. काही दिवसांपूर्वी चारोटी टॅपचे सहायक पोलीस निरीक्षक यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. बदली प्रशासकीय कारणास्तव असल्याचे पोलिसांनी सांगितले असले तरी हप्तेवसुली प्रकरण यामुळेच अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.   वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हप्तेखोरी प्रकरणाची दखल घेतल्याने सर्व स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police officer sudden change discussion issue installment recovery ysh

ताज्या बातम्या