सत्तेसाठी मोखाडय़ात शिवसेनेला तर तलासरीत ‘माकप’ला इतरांची मदत घ्यावी लागणार

पालघर : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, मोखाडा आणि तलासरी या नगर पंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे बुधवारी लागलेल्या निकालात  मोखाडा, तलासरीतील सत्ताधारांची पीछेहाट झाल्याचे दिसून आले आहे.  मोखाडय़ात  शिवसेनेला व तलासरीत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला सत्ता टिकवण्यासाठी इतर पक्षांची मदत घेणे आवश्यक झाले आहे. तर विक्रमगड येथे विक्रमगड विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे.

health of two election officials deteriorated due to heat wave In Nagpur
नागपुरात उन्हाच्या तडाख्यात दोन निवडणूक अधिकाऱ्यांची प्रकृती बिघडली, झाले असे की…
Nagpur, Rain, Pm Narendra Modi,
नागपूर : मोदींच्या सभास्थळी पावसाचे पाणी, शिंदेंकडून मध्यरात्री पाहणी
pune bjp marathi news, pune bjp lok sabha seats marathi news, pune bjp loksabha election marathi news
पुणे जिल्ह्यात भाजपची कोंडी
wealthy MP Bhandara
मागासलेल्या भंडाऱ्याचे श्रीमंत खासदार, मेंढे दाम्पत्याकडे १०१ कोटींहून अधिक संपत्ती…

विक्रमगड नगर पंचायतीमध्ये मागील वेळी काँग्रेसचा सहभाग असणाऱ्या विक्रमगड विकास आघाडीकडे सात आणि श्रमजीवी संघटनेचा पाठिंबा असणाऱ्या जागृत पॅनलचे सहा सदस्य मिळून सत्तास्थानी होते. तर भाजपचे दोन व राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य निवडून आला होता. यंदाच्या निवडणुकीत जिजाऊ  संघटना पुरस्कृत विक्रमगड विकास आघाडीचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. १४ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत विक्रमगड विकास आघाडीने १३ जागांवर विजय मिळवला असून एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. मार्क्‍सवादी  कम्युनिस्ट पक्षांचे ११ सदस्य असणाऱ्या तलासरी नगर पंचायतीमध्ये गतवेळी भाजपकडे चार व राष्ट्रवादीकडे दोन सदस्य होते. या निवडणुकीत तलासरीमधून  मार्क्‍सवादी  कम्युनिस्ट पक्षाची पीछेहाट झाली आहे. त्यांचे फक्त सहा सदस्य निवडून आले आहेत. भाजपची तलासरीमधील सदस्यसंख्या वाढली आहे.  ती सहापर्यंत त्यांनी नेली आहे.  शिवसेनेने आपले तलासरीतील खाते उघडले आहे. त्यांचे तीन सदस्य निवडून आले आहेत. तर दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. 

मोखाडा नगर पंचायतीमध्ये शिवसेनेने  असलेले निर्विवाद बहुमत (१३ सदस्य) गमावले असून या निवडणुकीत जेमतेम आठ जागांवर त्यांना विजय संपादन करता आला. राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्वीचे आपले दोन सदस्यांचे बलाबल दुप्पट केले असून त्यांचे चार सदस्य विजयी झाले आहेत. काँग्रेसचा एक सदस्य पुन्हा निवडून आला आहे.  नगर पंचायतीमधील त्यांचे बलाबल कायम राहिले आहे. भाजपने आपली सदस्यसंख्या दुप्पट करून या निवडणुकीत त्यांच्या दोन सदस्यांचा विजय झाला आहे. मोखाडा येथे भाजपसोबत लढणाऱ्या मोखाडा विकास आघाडीने दोन ठिकाणी विजय मिळवला. येथे सत्ता टिकवण्यासाठी सेनेला एका सदस्याच्या पािठब्याची गरज भासणार आहे.

राजकीय पक्षांना संमिश्र प्रतिसाद

या नगर पंचायत निवडणुकीत विविध राजकीय पक्षांना संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. मोखाडय़ात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेची पीछेहाट झाली असली तरीही शिवसेनेने तलासरी येथे आपले खाते उघडले आहे. पूर्वी बालेकिल्ला असणाऱ्या विक्रमकडमधून भाजप हद्दपार झाली तरीही भाजापची तलासरीमधील कामगिरी सुधारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे  मोखाडा येथील बलाबल वाढले असले तरीही तलासरी व विक्रमगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरी निराशा आली आहे.

जिजाऊ संघटनेचा प्रभाव

जिजाऊ संघटनेने विक्रमगड, मोखाडा व तलासरी येथे विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीत चंचुप्रवेश केला. मोखाडा येथे त्यांनी भाजपसोबत युती केली होती. तीनही नगर पंचायतीमध्ये  संघटनेचा प्रभाव दिसून आला.  विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार निवडून आले आहेत.  संघटना पुरस्कृत विक्रमगड विकास आघाडीने विक्रमगडमध्ये सत्ता राखली.  प्रस्थापितांचे समीकरण बदलण्यात विकास आघाडीचे महत्त्वपूर्ण योगदान ठरल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसून आले आहे.

पैशाचा बेसुमार वापर

निवडणुकीसाठी अडीचशे ते चारशे मतदारांचा प्रभाग असल्याने अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती  अपेक्षित होत्या.  सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी  नगर पंचायत क्षेत्रांमध्ये पैशाचा पाऊस पाडल्याचे  चित्र होते. अनेकदा एका मतासाठी दहा हजार ते पंचवीस हजार इतकी रक्कम दिल्याची चर्चा होती.