डहाणू : पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तलासरी, दापचरी, आंबोली, धानिवरी, धुंदलवाडी, महालक्ष्मी, घोळ, तवा, मस्तान नाका, हलोली, वरई, सतिवली येथे ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडल्याने अवजड वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. ठेकेदार कंपनीकडे तात्काळ खड्डे बुजवण्या ची मागणी वाहतूकदार करत आहेत.

मुंबई -अहमदाबाद महामार्गाची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबई- अहमदाबाद महामार्गावर गुजरात आणि मुंबईच्या दिशेने अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. महामार्गावर सर्व रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना गाडी चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे महामार्गावरील खड्डे बुजवण्याची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी केली जात आहे. अन्यथा अपघात होऊन वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.

मस्तान नाका, दुर्वेस, नांदगाव, मेंढवण, सोमटा, तवा, घोळ, चारोटी ते आच्छाड दरम्यान मोठमोठाले खड्डे पडल्याने वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावा लागतो. त्यामुळे मागून येणारे वाहन धडकून अपघाताच्या घटना घडत आहेत.