कासा : डहाणू तालुक्यातील कासा गाव तसेच आजूबाजूचे चारोटी, तलवाडा सायवन आदी ग्रामीण भागांत विजेचा लपंडाव सतत सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. चारोटीजवळ सध्या महालक्ष्मी मातेची यात्रा सुरू आहे, अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने यात्रेत अंधार होऊन गोंधळ उडतो.
डहाणू तालुक्यातील कासा गाव तसेच आजूबाजूचे चारोटी, तलवाडा सायवन आदी ग्रामीण भागांत सतत वीज येत-जात असते. महावितरण कंपनी भारनियमन करते आहेच, परंतु त्याची वेळ नक्की नाही. अतिशय अनियमितपणे येथे विजेचा पुरवठा होतो. त्यामुळे वाट्टेल त्यावेळी वीज जात असल्याने नागरिकांच्या त्रासात आणखी भर पडली आहे. वेळेवर वीज बिल न भरल्यास कर्मचारी लगेचच वीज कापण्यास धावतात, मग न सांगता, अवेळी वीज गायब होते, तेव्हा हेच महावितरणचे कर्मचारी असतात कुठे? गेल्या वर्षी महाराष्ट्र भारनियमनमुक्त होईल, अशी घोषणा करण्यात आलीहोती. तिचे पुढे काय झाले,असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
कासा, चारोटी भागात वीजबिल भरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, तरीही येथे वीजपुरवठा अनियमित असल्याने नागरिक चांगलेच वैतागले आहेत. वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, उन्हाळयमत विजेचा लोड वाढतो आणि वीज संयंत्रे ट्रिप होतात, परंतु ग्रामस्थांना हे मान्य नाही.
गेले काही दिवस तर सलग ८-८ तास सलग वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी विद्युत वाहिन्यांतील कमी-अधिक दाबामुळे विद्युत उपकरणांचेही नुकसान झाले आहे. मात्र नागरिकांच्या या त्रासाशी काहीच देणंघेणं नसल्यासारखा महावितरणचा कारभार निवांत सुरू आहे.
