scorecardresearch

रस्त्याअभावी गर्भवती महिलेचा डोलीतून प्रवास;मोखाडा तालुक्यातील मुकुंदपाडय़ाची अवस्था

मोखाडा तालुक्यापासून ३५ ते ४० किमी अंतरावर दरी-डोंगरात असलेल्या मुकुंद पाडय़ातील एका २० वर्षीय गरोदर मातेला पक्का रस्ता नसल्यामुळे ४ किमीचा डोंगर डोलीतून पार करावा लागल्याची धक्कादायक घटना घडली .

कासा : मोखाडा तालुक्यापासून ३५ ते ४० किमी अंतरावर दरी-डोंगरात असलेल्या मुकुंद पाडय़ातील एका २० वर्षीय गरोदर मातेला पक्का रस्ता नसल्यामुळे ४ किमीचा डोंगर डोलीतून पार करावा लागल्याची धक्कादायक घटना घडली . यामुळे मुकुंदपाडय़ाचा रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.
२० एप्रिल रोजी दुर्गा मनोहर भोये (वय २० वर्षे) या पाच महिन्यांच्या गरोदर मातेच्या पोटात संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानकपणे वेदना सुरू झाल्या, यानंतर तिच्या कुटुंबीयांनी १०८ ला कॉल करून कळवले, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे नरेश भोये यांनी सांगितले. यानंतर त्यांनी डोली करून ४ कि.मी.च्या अंतरावर असलेल्या आंब्याचा पाडा येथे पोहचले. यानंतर तिला आसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु पुन्हा पुढील उपचारासाठी तिला मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु हा प्रश्न एकटय़ा दुर्गाचा नाही अशा घटना या पाडय़ावर वारंवार घडत आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी या रस्त्याच्या समस्येबाबत कधी गांभीर्याने विचार करणार, असा संतप्त प्रश्न येथील रहिवासी विचारत आहेत.
देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करतंय. तर राज्य सरकार महाराष्ट्र प्रगती करतोय असा दावा करते, परंतु मोखाडा तालुक्यातील मुकुंदपाडय़ांचा रस्ता मात्र या विकासापासून दूरच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पाडय़ांना पाणी, रस्ते, आरोग्य आदी सुविधांपासून हे पाडे उपेक्षित आहेत.
मुकुंदपाडय़ाची दुर्दशा
१२८ आदिवासी लोकवस्तीच्या मुकुंदपाडय़ावर सोयीसुविधांचा अभाव आहे. येथे मिनी अंगणवाडी आहे, परंतु ती बंदच असते. शाळाही गेल्या पाच वर्षांपासून बंद आहेत. पाण्याची सोय नाही, त्यामुळे बारमाही नदीवरून खड्डा खोदून पाणी आणावे लागते. एवढेच काय रेशन दुकानावरचे धान्य आणण्यासाठी ८ किलोमीटरचा भला मोठा डोंगर पार करून त्यांना चिकाडीचा पाडा गाठावा लागतो. बरं एकाच फेरीत रेशन मिळेल याची शाश्वती नसते. यामुळे एका महिन्याचे धान्य आणण्यासाठी ४ ते ५ वेळा फेऱ्या माराव्या लागतात. पावसाळय़ात नदीच्या पलीकडे ये-जा करावी लागत असल्याने जीवघेणी कसरत करावी लागते. शाळकरी विद्यार्थ्यांना नदीत पोहून शाळा गाठावी लागते, तर चार महिने रेशन आणण्यासाठी नदीच्या प्रवाहातून धान्य प्लास्टिकच्या पिशवीत बांधून मोठय़ा शिताफीने नदी पार करावी लागते. तरी लवकरात लवकर या पाडय़ाला पक्का रस्ता देण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pregnant woman traveling doli road status mukundpada mokhada taluka amy

ताज्या बातम्या