पालघर जिल्ह्य़ात रब्बी पिके धोक्यात; वीट व्यावसायिक संकटात

वाडा :  पालघर जिल्ह्य़ाला बुधवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. जवळपास पाच ते सहा तास कोसळलेल्या पावसाने येथील रब्बी पिकांचे, शेतातील भाजीपाल्याचे नुकसान झाले असून वीट उत्पादक व पेंढा व्यापारीही मोठय़ा संकटात सापडले आहेत. वसईत मच्छीमारांनाही पावसाचा फटका बसला आहे.

खरीप हंगामानंतर पालघर जिल्ह्यात जवळपास १६ ते १७ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर, हरभरा, मूग, वाल या रब्बी पिकांचे उत्पादन घेतले जाते. काही शेतकऱ्यांनी अलीकडेच या रब्बी पिकांची पेरणी केली आहे. अवकाळी पावसाचे पाणी शेतात साचून राहिल्याने नुकतेच पेरणी केलेले बियाणे कुजून शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होणार आहे.

वाडा तालुक्यात मोठय़ा प्रमाणात हरभऱ्याचे उत्पादन घेतले जाते. गेले काही दिवस ढगाळ वातावरणामुळे फुलांवर आलेल्या हरभरा पिकाचे नुकसान झाले होते. बुधवारी कोसळलेल्या पावसामुळे या नुकसानात आणखीनच भर पडली. पालघर जिल्ह्यतील विक्रमगड, पालघर, वाडा तालुक्यात रब्बी हंगामात वाल, मूग, तूर तसेच तीळ, सूर्यफुल या तेलबियांचे उत्पादन घेतले जाते. या उत्पादनावर या अवकाळी पावसाचा विपरीत परिणाम होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

तलासरी तालुक्यातील बहुतांशी शेतकरी या हंगामात तिखट मिरचीची लागवड करतात. यावर्षी या तालुक्यात २५ ते ३० हेक्टर जमिनीवर येथील शेतकऱ्यांनी तिखट मिरचीची लागवड केली आहे. मिरचीचे पीक येण्यास अलीकडेच सुरुवात झालेली असताना त्याचे  नुकसान झाले आहे. डहाणू तालुक्यात गवत व पावली (पेंढा) मोठय़ा प्रमाणावर खरेदी करून त्याचे उघडय़ावरच गंज करून साठा केला जातो. या व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले आहे. मोखाडा, जव्हार वसई तालुक्यात साठवणूक केलेले खुरासणी, उडीद, नाचणीचे पीक वाया गेले आहे.

वाडा, विक्रमगड येथील अनेक शेतकऱ्यांनी भात झोडणी केलेली नाही. पावसात तो भात भिजला गेला आहे. पालघर जिल्ह्यत मोठय़ा प्रमाणावर वीट उत्पादक असून या वीट व्यवसायाला नुकतीच सुरुवात झाली आहे. विटा सुकण्या आधीच त्यावर पाऊस कोसळल्याने तयार  विटांची माती झाली आहे. नुकसानीचेही तात्काळ पंचनामे करून बाधितांना शासनाने मदतीचा हात द्यावा अशी मागणी येथील बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.

हिरव्या हरभराऱ्याचे उत्पादन धोक्यात

वाडा तालुक्यात रब्बी हंगामात हरभराचे मोठय़ा प्रमाणावर (दीड हजार हेक्टरमध्ये) पीक घेतले जाते. विशेषत:  येथील शेतकरी कच्चा हरभरा विकणे पसंत करतात. वाडा तालुक्यात हिरव्या हरभरा पिकाची दोन कोटींहुन अधिक रुपयांची उलाढाल होत असते. यामध्ये वाडा तालुक्यातील गातेस खुर्द व गातेस बुद्रुक या दोन गावांत ३० ते ३५ लाख रुपयांचा हिरवा (कच्चा) हरभरा विकला जातो. पावसामुळे येथील हिरव्या हरभराचे उत्पादन धोक्यात आले आहे.

खराब हवामानाचा फटका हरभरा पिकाला बसलेला असतानाच अवकाळी पावसामुळे संपूर्ण पीक हातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शाम पाटील, गातेस, ता. वाडा.

मजुरी खर्च व कोळशाच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने संकटात सापडलेले वीट उत्पादक नैसर्गिक आपत्तीमुळे अधिक अडचणीत आले आहेत.

नरेश पाटील, अध्यक्ष, वीट उत्पादक संघटना, वाडा तालुका