राष्ट्रीय महामार्गावर चारोटीतील केंद्राबाबत ‘आयआरबी’ कंपनीची उदासीनता

विजय राऊत

कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी टोल नाक्याजवळ आयआरबी कंपनीने सात वर्षांपूर्वी प्रथमोपचार केंद्राची इमारत बांधलेली आहे.  परंतु अजूनही या ठिकाणी  उपचार करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध झालेले नसल्यामुळे ते गेले सात वर्षांपासून बंदच आहे. त्यामुळे अपघातामध्ये गंभीर जखमी होऊन वेळेत उपचार न मिळाल्याने गेल्या सात वर्षांत अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

राष्ट्रीय महामार्गाचे काम खासगी कंपन्यांना देताना त्यांना काही नियम ठरवून दिले आहेत या नियमानुसार टोल वसूल करणाऱ्या कंपनीने प्रथम उपचार केंद्र,  स्वच्छतागृह, अद्ययावत रुग्णवाहिका, अपघात घडल्यास अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यासाठी क्रेन अशा सुविधा पुरविणे आवश्यक आहे. 

मुंबई-अहमदाबाद-राष्ट्रीय महामार्गाच्या टोलवसुलीचे काम आणि देखभाल दुरुस्तीचे काम आयआरबी कंपनी करत आहे.  परंतु कंपनीकडून  कुठल्याही नियमाचे तंतोतंत पालन होताना दिसून येत नाही.   चारोटी टोल नाका येथे सात वर्षांपूर्वी आयआरबी कंपनीने प्रथम उपचार केंद्राची इमारत बांधली आहे. परंतु अद्यापही या ठिकाणी डॉक्टर किंवा इतर कोणताही कर्मचारी वर्ग  भरण्यात आलेला नाही.  चारोटी टोल नाका परिसरात नेहमीच अपघात होत राहतात. प्रथमोपचार केंद्र नसल्यामुळे रुग्णांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालय,  मनोर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागते. 

महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बऱ्याचदा या शासकीय रुग्णालयांची माहिती नसल्याने जखमींवर  उपचार करण्यासाठी त्यांची धावपळ होते    कंपनीने केवळ टोलवसुली न करता प्रथम उपचार केंद्र, अद्यावत रुग्णवाहिकेची सेवा याकडे सुद्धा लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत. याबाबत आयआरबी कंपनीच्या प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.