|| निखिल मेस्त्री

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गतवर्षीच्या नुकसानभरपाईपासून शेतकरी वंचित

पालघर : गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसामुळे भात शेतीचे नुकसान झालेल्या पालघर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अजूनही पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे आधीच विविध समस्यांच्या फेऱ्यात सापडलेला शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे. त्यात अलीकडे झालेल्या नुकसानीची भरपाई तरी वेळेवर मिळेल का, असा प्रश्न आता शेतकरीवर्ग उपस्थित करू लागला आहे.

केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत भात या पिकासह नागली व उडीद या पिकासाठी जिल्ह्यातील  कर्जदार व बिगरकर्जदार असलेल्या ३४ हजार ८८९ शेतकऱ्यांनी विमा संरक्षित क्षेत्रासाठी विमा संरक्षित रक्कम भरणा केली होती. सरसकट नुकसान झाल्यास या विमा संरक्षणामध्ये शेतकऱ्यांना ६९ कोटी ८० लाख ६९ हजार रुपये नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते. आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसानीची तीन कोटी ९६ लाख १५ हजार रुपये विमा रक्कम प्राप्त झालेली आहे.  अलीकडेच कृषिमंत्र्यांनीही याबाबत विमा कंपन्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा केली होती. मात्र त्यानंतरही शासन व विमा कंपनीच्या चर्चेमध्ये शेतकरीवर्ग नाहक भरडला जात आहे. ज्या  पिकासाठी पीक विम्याची रक्कम भरली होती त्या पिकाची नुकसानी झाल्यानंतरही नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली असल्याचे आरोप शेतकरीवर्ग करीत आहे.

यंदाही शेतकऱ्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी कोरडी जाणार आहे, असे शेतकरी हवालदिल होऊन सांगत आहेत.

गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीमुळे खरीप कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी कर्जभरपाई करावी त्या बदल्यात सरकार पैसे देईल असा शासन निर्णय झाला होता. परंतु असे असतानाही घोषित केलेली ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई रक्कम अजूनही मिळाली नाही असे काही शेतकरी संघटना सांगत आहेत. विमा कंपन्यांच्या जाचक अटीमुळे विमा योजनेचे पैसे रखडले असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनामार्फत एनडीआरएफ नियमावलीनुसार नुकसानग्रस्त भात शेतीचे पंचनामे विमा कंपन्यांकडे पाठवले गेले असले तरी विमा कंपनीच्या उदासीनतेमुळे गेल्या वर्षभरापासून हजारो शेतकऱ्यांचे विमा योजनेची नुकसानभरपाई आजही रखडलेलीच आहे, असे सांगण्यात येत आहे. 

 विमा रकमेचे स्वरुप

भाताला हेक्टरी ९१०, नाचणी ४०० तर उडदाला ४०० रुपये विमा संरक्षित रक्कम ठरवण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या क्षेत्रानुसार ही विमा संरक्षित रक्कम बँकेत जमा करावयाची आहे. नुकसानभरपाई झाल्यानंतर विमा कंपनीच्या ठरवलेल्या नियमानुसार नुकसानभरपाईचे पंचनामे करून भाताचे नुकसान झाल्यास भात पिकाला हेक्टरी ४५ हजार रुपये नुकसानभरपाई, नाचणी व उडदाला हेक्टरी २० हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाते.

विमा योजनेत सहभाग

शेतकरी संख्या : ३४ हजार ८८९

विमा संरक्षित क्षेत्र : १६ हजार ७७६.२४ हेक्टर

विमा संरक्षित रक्कम : ६९ कोटी ८० लाख ६९ हजार

योजनेंतर्गत  झालेले वाटप

शेतकरी संख्या : १६९७

विमा संरक्षित क्षेत्र : ८६८.१३

प्राप्त रक्कम : तीन कोटी ९६ लाख १५ हजार

विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक व पिळवणूक सुरू आहे. विमा कंपनी ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक करीत आहे, असे आरोप शेतकरी करीत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे. – संतोष पावडे, शेतकरी संघर्ष समिती

नुकसानभरपाईसाठी विमा कंपनीकडे पाठपुरावा सुरू आहे, कृषिमंत्रीही यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत, लवकरच सर्व प्रश्न मार्गी लागून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल, असा विश्वास आहे.  – काशिनाथ तरकसे, जिल्हा कृषी अधीक्षक पालघर

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime crop insurance scheme fails farmers deprived of compensation akp
First published on: 26-10-2021 at 00:11 IST