पालघर: मुंबई अहमदाबाद महामार्गावर एका वाहन चालकाकडून जबरदस्तीने तीन लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या आरोपीला नाशिक येथून अटक करण्यात तलासरी पोलिसांना यश आले आहे. या आरोपीने पुणे, अहिल्यानगर व नाशिक येथे तब्बल २७ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.

२० एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास तलासरी तालुक्यातील उपलाट कलबटपाडा येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरात कडून मुंबईकडे येणाऱ्या वाडा येथील रहिवाशी संदीप पारधी हे महामार्गावर गाडी थांबवून खाली उतरले असता तीन अनोळखी इसमानी आपली दुचाकी गाडीच्या समोर उभी केली. संदीप पारधी यांना जबरदस्तीने गाडीत बसवून कल्याण बायपास येथे नेऊन गळ्यातील सोन्याची चैन अंगठी व रोख रक्कम असा तीन लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून कल्याण बायपास येथे त्यांना सोडून चारचाकी घेऊन पळून गेले.

याबाबत संदीप पारधी यांनी २२ एप्रिल रोजी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन इसम हे गुजरात बाजूकडून महाराष्ट्र आल्याचे दिसून आले. तसेच चोरी करिता आणलेल्या दुचाकी तेथेच उभी असल्याने दुचाकी बाबत अधिक तपास केला असता दुचाकी नाशिक हद्दीतून चोरी करून आणल्याचे निष्पन्न झाले.

आरोपींनी बाबत महामार्ग व कल्याण बायपास येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चार चाकी गाडी शहापूर मार्गे माळशेज घाटातून जुन्नर मार्गे पुणे परिसरात गेल्याचे दिसून आले. संबंधित परिसरात तांत्रिक तपास करून आरोपी विशाल तांदळे (२९) याला पुणे येथील मंचर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

याबाबत त्याने तलासरी पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली असून इतर दोन साथीदारासह गुन्हा केल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेली चार चाकी गाडी ही पुणे येथील परिसरात खून करण्यासाठी वापरणार असल्याबाबतचे त्याने निष्पन्न केले. या आरोपीला ५ मे रोजी अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरी झालेली चार चाकी गाडी व एक लाख २९ हजार रुपये व सोन्याचे दागिने असा पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संपत्तीत गुन्ह्यातील आरोपी हा कुख्यात आरोपी असून या आरोपीवर पुणे, अहिल्यानगर, नाशिक, मुंबई येथे १३ चोरीचे यासह जबरी चोरी, ३०७ अंतर्गत गुन्हा, अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचा गुन्हा असे जवळपास २७ गुन्हे नोंद आहेत. तसेच विशाल तांदळे हा आरोपी एक महिन्यापूर्वी तुरुंगातून सुटलेला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपीला रविवारी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून सबंधित गुन्ह्यातील इतर दोन आरोपींचा तपास तलासरी पोलीस घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड, पोलीस निरीक्षक स्थानी गुन्हे शाखा प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्निल सावंत देसाई, गोरखनाथ राठोड, संदीप सरदार, कैलास पाटील, दिनेश गायकवाड, नरेंद्र पाटील व विशाल लोहारे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली.