डहाणू: तहसीलदारांनी डहाणू समुद्रकिनाऱ्यावर वाळूचोरांना पकडून त्यांच्याकडून एक ट्रक जप्त केला तसेच एक लाख ५४ हजारांचा दंड लावून कारवाई करण्यात आली. डहाणू समुद्रकिनाऱ्यावर वाळूचोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. याचा किनाऱ्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळेच डहाणू समुद्र वाळू उपसा रोखण्यासाठी स्थानिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन शासनाने केले होते.
डहाणू समुद्रकिनाऱ्यावरील चिखले, नरपड, आगर, डहाणू खाडी, तडियाळे, गुंगवाडा वाढवण येथे पहाटेच्या सुमारास पिकअप आणि टेम्पोमधून अवैध वाळू उत्खनन आणि तस्करी वाढू लागली आहे. या बेसुमार वाळू उपशामुळे किनारे खचू लागले आहेत. मध्यंतरी डहाणू समुद्रकिनाऱ्यावरून दोन पिकअप वाळूची अवैध वाहतूक करत होते. स्थानिकांनी त्याचे चित्रणही केले होते. परंतु वाळू तस्करांकडून हल्ले होत असल्याने स्थानिकांनी थेट हस्तक्षेप न करता ही बाब सरकारी अधिकाऱ्यांकडे कळवली.
डहाणू किनाऱ्यावरील धाकटी डहाणू, चिंचणी, दिवा दांडा, डहाणू मांगेलवाडा, डहाणू दूबळपाडा, सतीपाडा, नरपड, आगर, चिखला, झाई आदी समुद्रकिनाऱ्यांवर रेती चोरांनी जणू तळच ठोकला आहे. विशेषत: मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत ही अवैध वाळू वाहतूक सुरू होते. बेसुमार वाळू उपशामुळे किनारा खचतो आहेच शिवाय येथील काही भागांत किनाऱ्यावरील संरक्षण कठडाही लाटांच्या माऱ्यामुळे तुटून गेलेला आहे. आता समुद्राचे पाणी गावची वेस ओलांडून रहिवाशांच्या घरापर्यंत पोहोचू लागले आहे. सतीपाडा आणि चिखला येथे तर वाळू उत्खननामुळे मोठमोठाले खड्डे किनाऱ्यावर तयार झाले आहेत. त्यामुळे रहिवाशी संतप्त झाले आहेत, तसेच रेतीचोरांविरुद्ध कारवाईची मागणी करत आहेत.
रहिवाशांना होणारा त्रास अवैध वाळूचोरीमुळे बुडणारा शासनाचा लाखो रुपयांचा महसूल, निसर्गाची हानी अशा कोणत्याच मुद्दय़ांकडे प्रशासनाचे लक्ष आहे की नाही, असा प्रश्न निसर्गप्रेमींना पडला आहे. एखाद्या दंडाइतकीच ही कारवाई मर्यादित राहू नये, असे ग्रामस्थांना वाटते.
अवैध रेतीउपशामुळे डहाणूच्या किनाऱ्यांची स्थिती गंभीर झाली आहे. त्याकडे वेळेत लक्ष न दिल्यास पावसाळय़ात आमच्या घरांत समुद्राचे पाणी घुसेल. लोकप्रतिनिधींनी याकडे कृपया लक्ष द्यावे. – धनेश आकरे

वाळूची चोरी रोखण्यासाठी आम्ही खास पथके तयार केली आहेत. वाळूचोरांवर कारवाईही करण्यात येत आहे. – अभिजित देशमुख, तहसीलदार

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Mobile thieves arrested 30 mobiles seized in kandivali
मुंबई : सराईत मोबाइल चोरांना अटक, ३० मोबाइल हस्तगत
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
Inconvenient as Sinnar buses go directly from the flyover without stopping at small villages
नाशिक: लहान गावांच्या थांब्यांना बससेवेची हुलकावणी