ठराविक धोरण नसल्यामुळे निधीचा अपव्यय

पालघर : करोनाच्या पहिल्या दोन लाटेदरम्यान रुग्ण वाहतुकीसाठी १०८ प्रणालीच्या रुग्णवाहिकांवर रुग्णांच्या स्थलांतराचा ताण येत असल्याचे लक्षात आल्याने जिल्ह्यतील पाच लोकप्रतिनिधींच्या आमदार निधीमधून तब्बल २६ रुग्णवाहिका जिल्हा प्रशासनाला मिळण्याच्या प्रक्रियेत आहेत. या रुग्णवाहिकेची किंमत साडेदहा लाख रुपयांपासून १५ लाखांपर्यंत असून यामध्ये प्रत्येक आमदाराने आपल्या पसंतीप्रमाणे वाहने खरेदी केल्याचे दिसून आले आहे.

करोना तपासणीसाठी रुग्णांना उपचार केंद्रात नेणे, त्यांना परत आणणे, करोना काळजी केंद्रांमधून गंभीर असणाऱ्या रुग्णांना आरोग्य केंद्रांमध्ये स्थलांतरित करणे तसेच गंभीर रुग्णाला वेळप्रसंगी समर्पित करोना रुग्णालयात स्थलांतर करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या १०८ प्रणालीच्या काही निवडक रुग्णवाहिका वर्ग करण्यात आल्या होत्या.  रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने व रुग्णवाहिकांची संख्या मर्यादित असल्याने अनेकदा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांना कोंबून त्यांची वाहतूक केली जात असे.

करोनाकाळातील गरज बघून अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या आमदार निधीमधून जिल्हा प्रशासनाला रुग्णवाहिका खरेदी करून दिल्या आहेत. विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी गेल्या वर्षी नऊ व विद्यमान वर्षी सात अशा एकंदर १६ रुग्णवाहिका दिल्या आहेत.

पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी दोन रुग्णवाहिका, आमदार विनोद निकोले, आमदार रमेश पाटील, आमदार शांताराम मोरे यांनी प्रत्येकी एक रुग्णवाहिका देऊ केली आहे. याखेरीज चालक पद रिक्त असल्याने किंवा रुग्णवाहिकांची अंदाजपत्रक मंजुरीसाठी प्राप्त न झाल्याने विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा येथील ग्रामीण रुग्णालय तसेच वाडा आरोग्य पथक यांच्यासाठी मंजूर झालेल्या रुग्णवाहिकांची खरेदी अजून प्रलंबित आहे.  आमदारांनी आपल्या पसंतीची तसेच रुग्णवाहिकेच्या उपलब्धतेनुसार वाहन खरेदी केले आहे.  त्यांच्या   खरेदी किमतीमध्ये मोठा फरक असल्याचे दिसून येत आहे. आमदार सुनील भुसारा यांनी खोडाळा, सूर्यमाळ, खानिवली, गोऱ्हे, तलवाडा, मलवाडा, वावर आदी भागांसाठी   साखरशेत  गेल्या वर्षी घेतलेल्या टेम्पो ट्रॅक्स बीएस६ टाइप पेशंट ट्रान्सपोर्ट वाहनाची खरेदी केली होती. त्याची किंमत १०.६९ लाख आहे. तर नव्याने यंदाच्या वर्षी कुर्जे, खानिवली, जामसर, बोरांदा, वाशाळा, साकुर, नांदगाव या ठिकाणी खरेदी करण्यात येणाऱ्या फोर्स ट्रॅव्हलर बीएसविआय ३३५० या रुग्णवाहिकेची किंमत १३.०७ लाख रुपये इतकी आहे. तलासरीचे आमदार विनोद निकोले यांनी आयएसयूझेडयू बनावटीची रुग्णवाहिका १५ लाखांना घेतली आहे. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी कासा व वाणगाव या भागांसाठी  टाटा विंगर रुग्णवाहिका १४.६९ लाख रुपयांना विकत घेतली आहे. आमदार रमेश पाटील यांनी सातपाटीसाठी मागवलेली रुग्णवाहिकेची किंमत १४.६७ लाख रुपये इतकी आहे.

 सद्य:स्थितीत किमान १२-१३ रुग्णवाहिका सेवेत दाखल झाल्या असल्या तरी त्याचा पुरेपूर वापर होताना दिसून येत नाही. अलीकडेच सोमटा येथे प्रसूतीसाठी घरून निघालेल्या महिलेला योग्य वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला होता. वाढलेल्या रुग्णवाहिका सेवा आणि १०८ प्रणालीच्या सेवेमध्ये समानवाच्या अभाव दिसून येत असून त्याचा फटका रुग्णसेवेवर होत आहे.

खरेदीत सुसूत्रतेचा अभाव

जिल्हा नियोजन विभागातर्फे खरेदी करण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकाची किंमत तसेच त्याच बनावटीच्या बाजारात उपलब्ध वाहनांच्या किमतीमध्ये काही प्रमाणात तफावत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता रुग्णवाहिकेचा विमा तसेच अंतर्गत व्यवस्थेबद्दल बदलांमुळे एकाच प्रकारच्या वाहनाच्या दोन किमतीमध्ये फरक पडत असल्याचे सांगण्यात आले. आमदारांच्या वेगवेगळ्या पसंतीमुळे जिल्ह्यात खरेदी होणाऱ्या रुग्णवाहिकांमध्ये सुसूत्रता नसल्याचे दिसून आले आहे. रुग्णवाहिकेचे मॉडेल एकत्रित निश्चित करण्यात आले असते तर या रुग्णवाहिकांची खरेदी किफायशीर किमतीत होऊन देखभाल दुरस्ती करणे सोयीचे ठरले असते.