डहाणू : जीवनावश्यक साहित्याचे आमिष दाखवून त्या बदल्यात शिधापत्रिका धारकांकडून गहू तांदूळ घेणाऱ्या दलालांचा पालघर जिल्ह्यातील काही तालुक्यांत सुळसुळाट झाला आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यांतील आदिवासी भागांमध्ये काही भंगार विक्रेते लसूण, साखर, चहा पावडर, तेल, साबण, कांदा-बटाटे, मिरची, सुकी मासळी तसेच घरगुती साहित्य वाहनात भरून फिरत असतात. सुमारे २० ते ४० वाहने ही गावागावांत फिरत असतात. त्यांना सोबत आणलेले जीवनावश्यक वस्तू देण्याचे आमिष दाखवून त्या बदल्यात या आदिवीसांकडून त्यांना सरकारी शिधावापट दुकानात स्वस्तात मिळणारे गहू तांदूळ विकत घेत असतात.
हे भंगार विक्रेते गोळा झालेले गहू तांदूळ हे धान्य पालघर जिल्ह्यामध्ये एका मोठय़ा व्यापाऱ्याकडे जमा करतात. हे धान्य हे सेलवास मार्गाने गुजरातला पाठवले जाते. तेथे बिअर आणि मद्य बनवण्यासाठी तेथे वापर केला जातो, असे सांगितले जाते. भंगार वाल्यांना बटाटे कांदे घेऊन गहू-तांदूळ विकणे बंद करावे अशी मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे. डहाणू येथील कैनाड या गावात असा प्रकार होत असल्याचे किसान सभेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोरखना यांनी उघडकीस आणला आहे.
शिधापत्रिका लाभार्थीनी शिधा दुकानातील गहू, तांदूळ अशा प्रकारे विकणे बंद करावे ते बेकायदा आहे. तपासामध्ये अशा प्रकारात एखाद्या लाभार्थीचे नाव आल्यास त्याची शिधापत्रिका रद्द होऊ शकते असा इशारा चंद्रकांत घोरखना यांनी दिला आहे.