पालघर : अपंगांचा आत्मसन्मान, आत्मनिर्भरता आणि सामाजिक समावेशासाठी समर्पित असलेल्या “पर्पल फेअर २०२५” या भव्य उपक्रमाचे आयोजन २७ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम अली यावर जंग राष्ट्रीय वाचा आणि श्रवण दिव्यांगजन संस्था, बांद्रा, मुंबई, जिल्हा परिषद पालघर समाजकल्याण विभाग यांच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली आयोजित होत आहे.
या फेअरचे आयोजन डॉ. सुमन कुमार, संचालक, अली यावर जंग संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, जिल्हा प्रशासन, दिव्यांग कल्याण विभाग, सामाजिक कल्याण विभाग, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार, तसेच विविध स्वयंसेवी संस्था आणि विशेष शाळांचा या उपक्रमात सक्रीय सहभाग आहे.
पालघर जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या या उपक्रमात अपंग उद्योजक व कलाकारांसाठी उत्पादन व कला प्रदर्शनाचे स्टॉल्स, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘पर्पल स्पोर्ट्स’ अंतर्गत क्रीडा स्पर्धा, सहाय्यक साधनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व वाटप, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, रोजगार मेळावा आणि शासकीय योजनांची माहिती देणारे सेवा स्टॉल्स यांचा समावेश असेल.
या कार्यक्रमाला पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार, आमदार, अपंग कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
“पर्पल फेअर २०२५” चा मुख्य उद्देश दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना आपल्या कला, उद्योजकीय आणि क्रीडा क्षमतेद्वारे स्वतःचे स्थान निर्माण करता यावे यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. तसेच रोजगार व सहाय्यक साधनांच्या माध्यमातून त्यांचे सक्षमीकरण करणे, शासकीय योजनांची माहिती पोहोचवणे आणि सामाजिक भान वाढवणे यालाही या उपक्रमातून चालना मिळणार आहे.
या विशेष उपक्रमामध्ये अपंग नागरिक, पालक, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.