शहरबात : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

पालघर शहरातील माजी नगरसेवक जावेद लुलानिया यांच्यावर गेल्या आठवडय़ात गोळीबार करून जीवघेणा हल्ला झाला.

नीरज राऊत

पालघर शहरातील माजी नगरसेवक जावेद लुलानिया यांच्यावर गेल्या आठवडय़ात गोळीबार करून जीवघेणा हल्ला झाला. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

पालघर शहरामध्ये रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भरवस्तीमध्ये व मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर गोळीबार करून निसटण्यात यश मिळाले. त्यामुळे हल्लेखोरांचे धाडस व त्यांनी परिसराचा केलेला अभ्यास (रेकी) परिपूर्ण असल्याचे दिसून येते. काही महिन्यांपूर्वी एका बॅनर व्यावसायिकावर झालेल्या गोळीबारानंतर शहरात वेगवेगळ्या प्रवाहाची चर्चा झाली होती. पोलिसांनी सर्व दृष्टिकोनातून तपास केल्यानंतरदेखील त्या प्रकरणातील निश्चित कारण शोधण्यात व मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अपयश आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून कोटय़वधी रुपयांचा खर्च करून पालघर पोलीस मुख्यालयात ‘मध्यवर्ती नियंत्रण कक्ष’ उभारण्यात आला असून त्याला महत्त्वाच्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची जोड दिली. या दोन्ही गोळीबाराच्या गुन्ह्यंमध्ये मारेकऱ्यांनी पोलिसांच्या पाळत ठेवणाऱ्या यंत्रणेवर व गस्ती व्यवस्थेला बगल दिल्याचे दिसून येते.

 वाहन चोरी, इंटरनेट, टेली कॉलिंगद्वारे फसवणूक किंवा फसवून बँक खात्यातून पैसे काढणे (फिशिंग) असे गुन्हे नोंदवताना अनेकदा पोलीस स्टेशन या गुन्ह्यांची नोंद करून खूप काही निष्पन्न होण्याची शक्यताच नाही, अशी नाउमेद तक्रारदाराकडे व्यक्त करताना दिसतात. सायबर गुन्हे शाखा असताना फसवणुकीच्या गुन्ह्यंची अपेक्षित प्रमाणात उकल झाली नसल्याचे दिसून येते.

काही घटनांमध्ये जिल्ह्यबाहेरील पोलिसांनी येऊन छापे टाकल्याच्या घटना ताज्या असून अशा ठिकाणी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचे संबंधित गुन्हेगारांशी साटेलोटे असल्याचा संशय व्यक्त होतो. आर्थिक गुन्ह्यंबाबत जव्हार नगर परिषदेसह अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यंमध्ये मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यात अजूनही यश लाभले नाही. तक्रारदारांशी बोलताना अरेरावी करणे, सर्वसामान्य नागरिकांना खाकीचा जरब दाखविणे असे चित्र जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये दिसून येते. सुशिक्षित नागरिकांना पोलिसी खाक्या दाखवूनच दहशत निर्माण करायचे इतकेच पालघरचे पोलिसांनी साध्य केले आहे, असे दिसून येते.

पाकिस्तानमधून सागरी मार्गाने तस्करी होणारे अमली पदार्थावर रोख लावण्यासाठी पालघर पोलिसांकडे विशेष यंत्रणा कार्यान्वित झाल्याचे दिसून येत नाही. शेजारच्या गुजरात राज्यात अंमली पदार्थाविरुद्ध मोठय़ा प्रमाणात कारवाई सुरू असताना जिल्ह्यामध्ये त्या स्वरूपाचे गुन्हे नोंदवले गेल्याचे दिसून आले नाही. जिल्ह्यात मटका व जुगार अनेक ठिकाणी खेळला जात असून सीमावर्ती भागाचा परराज्यातून जुगार खेळणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे धाडस स्थानिक पोलिसांनी दाखविले नाही. त्याचप्रमाणे दारू व गुटखा व्यापार राजरोसपणे सुरू असून त्यावर नियंत्रण ठेवण्यास स्थानिक पोलिसांना अपयश आले आहे.

 जिल्ह्यच्या औद्योगिक क्षेत्रात भंगार व्यावसायिकांमार्फत किंवा अन्य मार्गाने होणारी भंगार व इतर वस्तूंची चोरी हीदेखील तितकीच दुर्लक्षित बाब आहेत. इतर राज्यांतील किंवा उद्योगांकडून निघणारे सांडपाण्याचे टँकर नद्या-नाल्यांमध्ये सोडून द्यायचे प्रकारदेखील घडत असून एकंदरीत पोलीस यंत्रणा गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे.

गेल्या काही वर्षांत जवाहिऱ्याच्या व्यापाऱ्यांच्या दुकानांवर पडलेल्या काही मोठय़ा दरोडय़ांमध्ये गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यास किंवा मुद्देमाल परत मिळविण्यास पोलिसांना अपयश आले आहे. गुरांची तस्करी, गोहत्या असे प्रकार अधूनमधून जागरूक नागरिकांमार्फत उघडकीस येत आहेत. पोलिसांना आवश्यक असलेल्या गुप्तचर माहिती आवश्यक प्रमाणात प्राप्त होत नसल्याने स्थानिक पातळीवरील गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. सर्वसामान्य नागरिकांना खाक्या दाखविण्याऐवजी गुन्हेगारांमध्ये पोलिसांची दहशत निर्माण करण्याची गरज असून गस्तीसाठी असणाऱ्या वाहनांचे योग्य पद्धतीने वापर करणे तसेच गस्ती नाक्यांवर असलेल्या पोलीस बंदोबस्तमधील कर्मचाऱ्याने अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. पालघर पोलिसांमध्ये रिक्त जागा असल्याने पोलिसांवर काही प्रमाणात कामाचा त्राण पडतो ही बाब खरी आहे.  पोलिसांच्या वेगेवेगळ्या विभागांमध्ये असणारी अंतर्गत चढाओढ ही गुन्हेगारांना काही प्रसंगी लाभदायक ठरल्याचेदेखील दिसून आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी पालघर पोलिसांनी एकसंध होऊन पुन्हा जोमाने कार्यक्षम होणे गरजेचे झाले आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Question law order ysh

Next Story
पालघर : जावेद लुलानिया गोळीबार प्रकरणात दोन संशयित आरोपी अटकेत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी