१५०० क्विंटल भात चार वर्षांपासून गोदामात पडून

पालघर जिल्ह्यत आदिवासी विकास महामंडळकडून भाताची  खरेदी आधारभूत किंमतीत केली जाते

उंदिर, घुशींचा वावर; आदिवासी विकास महामंडळाचा निष्काळजीपणा

वाडा:  पालघर जिल्ह्यत आदिवासी विकास महामंडळकडून भाताची  खरेदी आधारभूत किंमतीत केली जाते. जिल्ह्यत यासाठी अनेक खरेदी केंद्रे कार्यान्वित केली जातात. खरेदी केलेल्या भाताची जवळच्या  भात भरडाई गिरणीत भरडाई करून घेतली जाते. मात्र वाडा तालुक्यातील गोऱ्हे येथील भात खरेदी केंद्राच्या गोदामात गेल्या पाच  वर्षांंपासूनचा भात पडून आहे. या भाताला घुशी व उंदीर लागल्याने त्याची अवस्था दयनीय झाली आहे .या प्रकाराने आदिवासी विकास महामंडळाचा हलगर्जीपणा चव्हाटय़ावर आला आहे.

वाडा तालुक्यात परळी, खानिवली, कळंभे, खैरे आंबिवली, पोशेरी व गोऱ्हे या ठिकाणी असलेल्या खरेदी केंद्रावर आदिवासी विकास महामंडळाकडून भात खरेदी केंद्रे चालवली जातात. येथील शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेले भात या केंद्रावर खरेदी केले जाते.

 सन २०१७ -२०१८ या सालात गोऱ्हे केंद्राने सुमारे १५०० क्विंटल भात खरेदी केले होते. ते आजतागायत येथील गोदामात पडून आहे. गेल्या पाच वर्षांत या भाताचा लिलाव न केल्याने ते तसेच  पडून आहे. भात इतके वर्ष पडून राहिल्याने त्याचे वजन कमी झाले आहे. त्याला घुशी उंदरे लागल्याने ते पूर्ण वाया गेल्याची भीती जाणकार व्यक्त करीत आहेत. भात अनेक वर्षे राहिल्यास त्याची प्रत खाळावते व ते खाण्यास उपयुक्त राहात नाही. गेली अनेक वर्षे हे भात पडून राहिल्याने ते वाया गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आदिवासी विकास महामंडळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा या भाताची दुरावस्था झाली असून शासनाचे लाखो रुपये यामुळे वाया गेले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. गोदामात भात सुरक्षित असुन येत्या काही दिवसांतच या भाताचा लिलाव केला जाईल, असे मोखाडा अंतर्गत वाडा उपप्रादेशिक व्यवस्थापक राजेंद्र पवार  यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Quintals lying warehouse years ysh

Next Story
पालघर शहरात उद्योगांमुळे जलप्रदूषण
ताज्या बातम्या