पालघर : रेल्वेमध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांना मिळणाऱ्या विशेष पासचा गैरउपयोग करून विना तिकीट प्रथम व आरक्षित डब्यांमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असताना त्यामध्ये राज्य पोलीस, रेल्वे पोलीस यांच्यासह गँगमन व इतर रेल्वेशी संबंधित मंडळी देखील प्रथम दर्जाच्या डब्यामधून राजरोसपणे प्रवास करताना दिसून येत आहेत. यामुळे अतिरिक्त भाडे मोजून तिकीट अथवा सीजन तिकीट (पासधारक) यांना उपनगरीय गाड्यांमधून तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून उभ्याने प्रवास करण्याची नामुष्कीली ओढवली आहे.

विरार ते डहाणू रोड दरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिकिकरण होत असून यामुळे कामधंदा निमित्ताने मुंबईला प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एप्रिल २०१३ पासून उपनगरीय सेवा सुरू झाल्या असल्या तरी या उपनगरीय गाड्यांची संख्या मर्यादित राहिली आहे. शिवाय दैनंदिन प्रवाशांना उपयुक्त ठरणाऱ्या वलसाड फास्ट पॅसेंजर व फ्लाईंग राणी या गाड्यांच्या प्रथम दर्जाच्या डब्यांमध्ये देखील दैनंदिन प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

पश्चिम रेल्वे तसेच मध्य रेल्वे मध्ये कार्यरत असणारे अनेक रेल्वे अधिकारी व कर्मचारी हे विरार पलीकडच्या उपनगरीय क्षेत्रात निवास करीत आहेत. अशा रेल्वे कर्मचाऱ्यांना देशभरात प्रवास करण्यासाठी वार्षिक पास दिला जात असतो. या वार्षिक पासचा गैरउपयोग करून तसेच मासिक पास किंवा दैनंदिन तिकीट न काढता रेल्वे कर्मचारी हे प्रथम दर्जाच्या डब्यांमध्ये राजरोसपणे प्रवास करताना दिसून येतात. तिकीट तपासणी करिता मनुष्यबळ आल्यास आपण रेल्वेचे कर्मचारी असल्याचे सांगितले जात असल्याने अशांची कारवाई पासून सुटका होत असल्याचे देखील दिसून आले आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांसह राज्य पोलीस दलाचे कर्मचारी तसेच रेल्वे पोलीस हे देखील मीरा-भाईंदर, वसई विरार आयुक्तालय तसेच मुंबई पोलिसांमध्ये कार्यरत असताना प्रथम दर्जाच्या डब्यांमधून प्रवास करताना दिसून येतात. अशा व्यक्तींकडून तिकीट तपासणी यांना स्टाफ असल्याचे सांगून वेळ मारून नेण्यात येते.

अशाप्रकारे रेल्वे व पोलिस कर्मचाऱ्यांकडून गर्दीच्या वेळी प्रथम दर्जाच्या आसनक्षमतेपैकी ३० ते ४० जागा व्यापल्या जात असून ज्या प्रवाशांनी अधिक रक्कम भरून तिकीट अथवा पास काढला आहे त्यांना आसन मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

सध्या पश्चिम रेल्वेचे विरार ते डहाणू रोड दरम्यान चौपदरीकरणाचे काम जोमाने सुरू असून समर्पित मालवाहू रेल्वे मार्गीका कार्यरत झाल्याने या रेल्वे प्रणालीच्या देखभाल दुरुस्तीसाठी देखील मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ कार्यरत असते. यापैकी अनेक गॅंगमन, कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने कार्यरत असले तरीही ही मंडळी उपनगरीय रेल्वेच्या प्रथम दर्जाच्या डब्यांचा राजरोसपणे वापर करत असल्याचे आढळून आले आहे. अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे रेल्वे असे लिहिलेले कपडे परिधान केल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई होत नसल्याचे दैनंदिन रेल्वे प्रवाशांचे म्हणणे आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष योजना कार्यरत असल्यास महत्त्वाच्या गाड्यांना अथवा उपनगरीय फेऱ्यांना रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी राखीव डबा ठेवावा अशी उपहासाने मागणी दैनंदिन प्रवाशांकडून केली जात आहे.

या संदर्भात पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गॅंगमन कडून प्रथम दर्जाच्या डब्यात होणाऱ्या प्रवाशासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे अथवा रेल्वे कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांकडून राजरोसपणे प्रथम दर्जाच्या डब्यांमधून होणाऱ्या प्रवासाबद्दल रेल्वेची भूमिका सांगण्यास असमर्थता दर्शवली.

काटेकोर तपासणीची गरज

अनेक रेल्वे कर्मचारी हे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आसने अडवून ठेवत असल्याचे प्रकार घडल्याचे आरोप यापूर्वी झाले होते. वलसाड फास्ट पॅसेंजर सारख्या गाडीमध्ये प्रथम दर्जासाठी विशेष टिकीट तपासणी पथक कार्यरत असले तरी त्यांच्याकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना अभय दिले जात असल्याचे सांगण्यात येते. उपनगरीयसेवेची संख्या वाढवली जात नसताना अशा परिस्थितीत प्रथम दर्जाचे तिकीट काढून उभ्याने प्रवास करण्याची नामुश्किल दैनंदिन प्रवाशांवर आली आहे. उपनगरीय गाड्यांमध्ये विरार पलीकडच्या स्थानकांत दरम्यान विशेष तपासणी पथक कायम कार्यरत ठेवावे अशी देखील मागणी केली जात आहे.