scorecardresearch

गुरांना रोखण्यासाठी रेल्वे मार्गावर कुंपण;पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल प्रवाशांमध्ये नाराजी

पश्चिम रेल्वेच्या ६२२ किलोमीटर मार्गावर दोन्ही बाजूने मेटल बीमचे कुंपण घालण्यात येणार आहे.

fencing track to prevent cattle
(संग्रहित छायाचित्र) (Twitter/ AshwiniVaishnaw)

पालघर/ बोईसर : मुंबई -अहमदाबाद दरम्यान रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाडय़ांमुळे माार्गावर येणाऱ्या गुरांचा अपघात टाळण्यासाठी या मार्गावर कुंपण टाकण्याचे रेल्वे प्रशासनाने योजिले आहे. ही स्वागतार्ह बाब असली  तरी २०१३ पासून घोषित  उपनगरीय क्षेत्रातील पायाभूत सुविधांकडे रेल्वेने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे उपनगरीय प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर  आहे.

पश्चिम रेल्वेच्या ६२२ किलोमीटर मार्गावर दोन्ही बाजूने मेटल बीमचे कुंपण घालण्यात येणार आहे. एकूण २४५.२६ कोटींच्या या कामाची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी केली असून मे २०२३ पर्यंत हे कुंपणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.   यासाठी निविदा प्रक्रिया जारी करण्यात आली असल्याचे रेल्वेतर्फे माहिती देण्यात आली आहे. या चांगल्या गोष्टी घडत असताना वैतरणा ते डहाणू दरम्यान रेल्वे स्थानक वाढत्या गर्दीच्या अनुषंगाने पादचारी जिने, सरकते जिने, उद्वाहन, शौचालय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, इंडिकेटर, कोच पोजिशन इंडिकेटर इत्यादी सुविधा  अपूर्ण आहेत, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.  

सातवेळा अपघात

मुंबई-अहमदाबाद दरम्यान ३० सप्टेंबरपासून सुरू  झालेली वंदे भारत एक्सप्रेस ही सेमी हायस्पीड ट्रेन प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्र ठरली आहे.मात्र सुरवातीपासूनच या ट्रेनला अपघातांचे ग्रहण लागले आहे. ही ट्रेन धावत असताना आत्तापर्यंत गुजरात राज्यात ट्रेनच्या मार्गात अचानक शेतकऱ्यांची गुरे आल्याने सात वेळा अपघात झाले आहेत.या अपघातांमध्ये प्रवाशांना सुदैवाने कोणतीही ईजा झाली नसली तरी ट्रेनच्या पूढील भागाचे मात्र मोठे नुकसान झाले होते.

उपनगरीय क्षेत्रात कुंपण घालण्यास अडचण

डहाणू ते वैतरणा पट्टय़ात  रेल्वे मार्गाच्या पूर्वेला समर्पित मालवाहूसाठी दोन मार्गिका, तर पश्चिम बाजूस उपनगरीय रेल्वे चौपदरीकरण काम सुरू असल्याने या भागात सहा मार्गिका समांतर टाकल्या जाणार आहेत. चौपदरीकरण प्रकल्पात अजूनही भूसंपादन प्रलंबित असल्याने मेटल बीम कुंपणाचे संरक्षण उभारणे आव्हानात्मक ठरणार आहे.

डहाणू ते वैतरणामधील स्थानकांत  इंडिकेटर्स, अद्ययावत स्वच्छतागृहे नाहीत,  सरकते जिने, उद्वाहन तसेच पावसाळी छप्पर नाही. डहाणू ते वैतरणा चौपदरीकरणाचा प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख मार्च  २०२२ पासून मार्च २०२७ पर्यंत पुढे गेली आहे. डहाणू -नाशिक रेल्वे मार्ग लाल फितीत अडकून पडला आहे. हे सगळे अपूर्ण प्रकल्प आणि मूळ सुविधांना आधी प्राधान्य देणे आवश्यक आहे. 

हितेश सावे, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 19:59 IST
ताज्या बातम्या