पालघर : तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पालघर जिल्ह्यच्या अनेक भागांमध्ये गुरुवारी दुपारपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती.अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. या पावसामुळे जिल्ह्यतील बळीराजा सुखावला आहे.
पालघर, डहाणू, वाडा, विक्रमगड या भागात पावसाचा जोर होता. सकाळी निरभ्र आकाश व कडकडीत ऊन होते. मात्र दुपारी १२ नंतर मेघ गर्जनेसह ढगांचा गडगडाट सुरू झाला व जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे जमिनीत ओलावा आल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला. जमिनीत ओलावा आल्याने ज्या शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागती केल्या होत्या त्या शेतकऱ्यांमार्फत येत्या दोन दिवसात भाताच्या पेरण्या होतील. जिल्ह्यत आतापर्यंत सुमारे १५०० हेक्टर जमिनीवर खरीप हंगामातील भात पिकांसह कडधान्य पिकांची पेरणी झालेली आहे. उर्वरित ३५०० हेक्टर जमिनीवर जूनच्या तिसऱ्या चौथ्या आठवडय़ापर्यंत पेरण्या पूर्ण होणे अपेक्षित आहे.
गुरुवारी पडलेल्या पावसाने कुठेही नुकसान झाल्याची नोंद नाही.पश्चिम उपनगरीय रेल्वे सेवा वेळेत सुरू होत्या. मात्र रस्त्यावरील वाहतूक जोरदार पावसाने संथगतीने सुरू होती.जिल्ह्यतील नद्या, नाले, ओहोळ काही प्रमाणात भरले होते.
पावसाची नोंद (मि.मी.)
वसई- ३९, जव्हार-६.६७, विक्रमगड १७.३ मोखाडा ४.६५, वाडा ३.२५, डहाणू २४.९, पालघर २१.३३, तलासरी १४.१
पालघर जिल्हा -एकूण १३१.२