दुरुस्ती कामाच्या मंजुरीनंतरही रस्त्यात खड्डे कायम

पालघर नगर परिषद हद्दीतील खड्डेमय रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या मंजुरीनंतरही काम सुरू न केल्यामुळे शहरवासीयांचा खडतर प्रवास कायम आहे.

नगर परिषद लक्ष देत नसल्याचे स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती नगरसेवकांनी केली.

पालघर शहरात नागरिकांचा खडतर प्रवास सुरूच

पालघर : पालघर नगर परिषद हद्दीतील खड्डेमय रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या मंजुरीनंतरही काम सुरू न केल्यामुळे शहरवासीयांचा खडतर प्रवास कायम आहे. नगर परिषद प्रशासन ठेकेदाराकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत असल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी नगर परिषद हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी सुमारे नऊ लाखाचे दोन टप्प्यात काम मंजूर केले गेले. त्यानंतर डांबरीकरणामार्फत खड्डे बुजवण्याच्या कामाचे आदेशही देण्यात आले. मात्र काम अजूनही सुरू झालेले नाही. कामाचे आदेश दिल्यानंतर ठेकेदार काम करत नसेल तर त्याच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची आहे. मात्र तसे न करता नगर परिषद मूग गिळून गप्प बसली आहे.

खासगी व सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही या खड्डय़ांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी वाहनचालक दररोज खड्डय़ांवरून ये-जा करीत असताना त्यांच्या वाहनाची दुरवस्था होत  आहे. त्यामुळे चालक व मालकही संताप व्यक्त करीत आहेत.

पालघर या खड्डय़ाच्या शहरामध्ये जगदंबा हॉटेल वसंतराव नाईक चौक ते टेंभोडे पेट्रोल पंपपर्यंत ठिकठिकाणी खड्डे आहेत. कचेरी रस्त्यावर भगिनी समाज शाळेकडे वळण रस्तावर, शिवाजी चौक ते आंबेडकर चौक, शिवाजी चौक ते जीवनविकास शाळा, लोकमान्य नगर मुख्य रस्ता, मोहपाडाअंतर्गत रस्ते, न्यायालय परिसर रस्ता व पुढे सेल्स टॅक्स कार्यालयपर्यंतचा रस्ता,जुने जिल्हा परिषद कार्यालयामागून औद्योगिक वसाहतकडे जाणारा रस्ता, नवली फाटक रस्ता, टेम्भोडे नागरी आरोग्य केंद्रापासून चाफेकर कॉलेज रस्ता,देवीसहाय रस्ता, विष्णू नगर मुख्य रस्ता, मॅकलोड्स कंपनी ते मनोररोड जोडरस्ता,ज्येष्ठ नागरिक भवन उद्यानालगत पुढे माहीम रस्त्याला जोडणारा रस्ता, गोल्ड टॉकीजकडे जाणारा अंतर्गत रस्ता,वेवुर-नवली भागातील काही मुख्य व जोड रस्ते,वेवुर औद्योगिक वसाहतीतील रस्ते आदी अनेक ठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य आहे.

 दरम्यान याबाबत नगरपरिषदेचे नियोजन सभापती रोहिणी अंबुरे यांनी  नगर परिषदेच्या रस्त्यांतील खड्डय़ांवर दर्जाहीन तकलादू मलमपट्टी केल्याचे निवेदन याआधीच प्रशासनाकडे दिले आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेता काम तातडीने सुरू व्हावे, या दृष्टीने लक्ष दिले जाईल, असे सांगितले आहे. तर गटनेते कैलास म्हात्रे यांनी  खड्डे बुजविण्यासाठी कामाचे आदेश ठेकेदाराला दिले आहेत. काम सुरू होत नसल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजवा, असे प्रशासनाला सूचित केले आहे. 

कार्यादेश कधीच दिलेला आहे. अजून काम झालेले नाही का? काम झालेले नसल्यास तातडीने ते करून घेण्याचा सूचना देते.

स्वाती देशपांडे-कुलकर्णी, मुख्याधिकारी, नगर परिषद, पालघर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Repair work road pits ysh

ताज्या बातम्या