पालघर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढवण बंदराबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने पश्चिम किनारपट्टी भागातून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. वाढवण व इतर गावांमध्ये पवार यांच्याविरुद्ध असंतोष पसरला आहे.
गेल्या आठवडय़ात पालघर जिल्ह्याच्या डहाणूतील एका पतसंस्थेच्या उदघाटनासाठी अजित पवार यांनी दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणादरम्यान सरकारला विकास हवा आहे, असे सांगून येथील वाढवण प्रश्नावर अप्रत्यक्ष व अनपेक्षित भाष्य केले होते.
पालघर तालुक्यात पंचवीस वर्षांपूर्वी वाढवण बंदर उभारण्याची घोषणा झाली, तेव्हापासून त्याला प्रखर विरोध सुरूच आहे. हे विनाशकारी बंदर असल्याने पर्यावरणासह समुद्री, मत्स्य सुरक्षा, मत्स्यव्यवसाय, समुद्रातील पोषक वातावरण, कृषी क्षेत्र, रोजगार आदी नेस्तनाबूत करणारे असल्याचे सांगून त्याला विरोध कायम आहे. बंदरामुळे स्थानिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे, असा प्रकल्पबाधित गावांचा आरोप आहे. वाढवण बंदर होऊ नये यासाठी बंदर विरोधी संघर्ष समितीमार्फत संघर्षांची लढाई सुरू आहे. न्यायालयीन वादही प्रलंबित आहेत.
पश्चिम किनारपट्टी भागात शिवसेनेचा व राष्ट्रवादीचा मोठा मतदार वर्ग आहे. बंदर होऊ नये यासाठी शिवसेना येथील लोकांच्या पाठीशी आहे असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात बंदर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवल्याने येथील अनेक गावांनी निवडणुकांवर बहिष्कार घातला होता. आंदोलनेही केली. शिवसेना वाढवण विरोधी भूमिका घेत असली तरी त्यावर ती ठाम नसल्याचे आरोप येथील नागरिक करीत आहेत. तर राष्ट्रवादीची यावर वेगळी भूमिका आहे. वाढवण बंदर होण्याविषयीचे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. तेव्हा वाढवणवासीयांचा विरोध उफाळून आला होता.
त्यानंतर जिल्ह्यातील दौऱ्यात राष्ट्रवादीचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रश्नावर मौन बाळगले होते. मात्र आम्ही शरद पवारांच्या बाजूनेच असू, असेही ते म्हणाले. आता उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी डहाणूतील कार्यकर्ता बैठकीत थेट वाढवण बंदराच्या मुद्दय़ाला हात घालून ते होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यामुळे वाढवण बंदर होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक आहे असे दिसते. याउलट शिवसेना वाढवण संघर्षांत स्थानिकांसोबत आहे.
मात्र अलीकडील काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत या मुद्दय़ावर वाढवण संघर्ष समिती, मच्छीमार प्रतिनिधी यांची चर्चा होताना हे बंदर नकोच अशी स्पष्टता घेणे आवश्यक होते. बंदर का नको, बंदराचे दुष्परिणाम आदीची कारणमीमांसा स्पष्ट करावी लागेल. तसे पुरावे गोळा करून केंद्राच्या निदर्शनास आणून द्यावे लागेल अशी दुहेरी भूमिका घेऊन ठाकरे यांनीही संघर्षांची पकड सैल केल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढवण संदर्भात वक्तव्य केल्यानंतर या वक्तव्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर सर्वत्र पसरू लागली. त्यानंतर किनारपट्टीलगतच्या भागात ज्यांचा वाढवणला विरोध आहे, अशांनी पवार यांच्या वक्तव्यावर टीका करायला सुरुवात केली. तसेच त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला गेला.
उपमुख्यमंत्र्याच्या वक्तव्याचा हेतू जनतेच्या भावना दुखावण्याचा नव्हता. विकासाचा मुद्दा हे त्यांचे वैयक्तिक मत होते. महाविकास आघाडी सरकार येथील जनतेच्या सोबत आहे आणि पुढेही राहील असा ठाम विश्वास आहे. – अनिल गावड, जिल्हा, सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस, पालघर
शिवसेनेने वाढवणवासीयांच्या बाजूची भूमिका घेतली असताना उपमुख्यमंत्री यांनी वाढवण उभारणीचे व डहाणूतील पर्यावरणीय निर्बंध शिथिल करणारे केलेले वक्तव्य केले. मंत्र्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी. – वैभव वझे, सचिव, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती