scorecardresearch

तारापूर मंडळ क्षेत्रात स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढले; ३०० घरे जमीनदोस्त

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण दूर करण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्यभरात निर्देश दिले आहेत.

तारापूर मंडळ क्षेत्रात स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढले; ३०० घरे जमीनदोस्त
फोटो- लोकसत्ता

पालघर: पालघर तालुक्यात गुरचरण जमिनीवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी महसूल विभागातर्फे मोठी मोहीम राबवली जात असताना तारापूर मंडळ अधिकारी क्षेत्रामध्ये बांधलेली सुमारे ३०० घरे स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणधारकांनी निष्कासित केली. याखेरीज याच क्षेत्रातील सुमारे १५० एकर शेतजमिनीवरीलदेखील अतिक्रमण दूर करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण दूर करण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्यभरात निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना  देण्यात आल्या आहेत.  पालघर शहर, केळवे रोड व बेटेगाव येथे अतिक्रमणाविरुद्ध यापूर्वी कारवाई केली होती.

जिल्ह्यात सध्या पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात असल्याने पोलीस बंदोबस्त मिळण्यास मर्यादा येत आहे. अतिक्रमण काढण्याच्या प्रक्रियेत अडचणी आल्या असल्या तरी काही ठिकाणी नागरिकांनी शासकीय कारवाई टाळण्यासाठी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तारापूर मंडळ अधिकारी क्षेत्रामध्ये पाम येथे १६०, नांदगाव येथे ५०, आलेवाडी येथे ३० तर गुंदवली येथे १७ ठिकाणी व्यावसायिक वापरातील शेड, घर, गाळे, चाळी या ठिकाणी असलेले अतिक्रमण नागरिकांकडून स्वत:हून काढण्यात आले. याचबरोबरीने आलेवाडी गुंदवली येथील  सुमारे १००  एकरसह या भागात १५० एकर शेतजमिनीवरील अतिक्रमण दूर केल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अतिक्रमण काढण्यासाठी कारवाई केली जात असताना न्यायालयाचा अवमान होणार नाही हे ध्यानी ठेवून पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, असे जिल्हा प्रशासनाने पोलीस अधीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे.

तारापूर मंडळ अधिकारी क्षेत्रामध्ये इतर भागांप्रमाणे पाच मार्ग व कुंभवली या भागातदेखील गुरचरण जमिनीवर झालेल्या अतिक्रमण काढण्यास आरंभ करण्यात आला असून उर्वरित अतिक्रमण पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर काढण्यात येईल, असे महसूल अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले

मोकळय़ा जागा राखणे आव्हानात्मक

गुरचरण जमिनीवरील अतिक्रमण काढल्यानंतर मोकळय़ा होणाऱ्या बहुतांश जागा या सलग नसून विखुरलेल्या स्वरूपाच्या आहेत. अशा ठिकाणी कुंपण घालणे अशक्य बाब असून अशा मोकळय़ा झालेल्या जागा राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना आखणे गरजेचे झाले आहे.

निष्कासित जमिनीचा सदुपयोग

गुरचरण जमिनीवरील अतिक्रमण विरुद्ध कारवाई केल्यानंतर निष्कासित करण्यात आलेली जमीन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वाधीन करणे अपेक्षित आहे. मात्र अशा मोकळय़ा जागेला कुंपण टाकून जागा वेढून घेणे किंवा त्या जागांवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी दक्ष राहण्यास स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम नसल्याचे दिसून आल्याने काही ठिकाणी मागणीनुसार किंवा शासकीय कामांसाठी या जमिनीचा वापर करण्याचे विचाराधीन असल्याचे पालघरचे जिल्हाधिकारी गोिवद बोडके यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 06:34 IST

संबंधित बातम्या