पालघर: पालघर जिल्ह्यातील करोना लसीकरणाच्या पहिला मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या अजूनही ९० टक्के पेक्षा कमी असून प्रतिबंधात्मक बूस्टर मात्रेसाठी पात्र असणाऱ्या एक लाख १४ हजार नागरिकांनी अजूनही हा डोस घेण्यासाठी उत्सुकता दाखवली नाही.
बारा वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी पात्र झाल्याने जिल्ह्यात २८ लाख २५ हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र असून त्यापैकी २५ लाख ४७ हजार नागरिक १८ वर्षांवरील वयोगटातील आहेत. अजूनपर्यंत लसीकरणाची पहिली मात्रा घेणाऱ्या नागरिकांची संख्या जेमतेम ८७ टक्के असून त्यामध्ये ८९ टक्के नागरिक अठरा वर्षांवरील आहेत. त्याचप्रमाणे सुमारे १८ वर्षांवरील ८२ टक्के नागरिकानी लसीकरणाची दुसरी मात्रा घेतली आहे.
शासनाने आरोग्य विभागातील कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रतिबंधात्मक बूस्टर लस मात्रा देण्यात येत असून आरोग्य विभागातील सुमारे २९ टक्के कर्मचाऱ्यांनी तर अत्यावश्यक सेवेतील सोळा टक्के कर्मचाऱ्यांनी अजूनपर्यंत प्रतिबंधात्मक लसमात्रा घेतलेले आहे. सद्य:स्थितीत १३ हजार ८५० आरोग्य विभागातील तर १३ हजार ५८० अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधात्मक लस घेतली नसून त्याचबरोबरीने ८६ हजारपेक्षा अधिक इतर नागरिक प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यासाठी पात्र असताना त्यांनीदेखील प्रतिबंधात्मक लस मात्रा घेण्यासाठी उत्सुकता दाखवली नसल्याचे दिसून आले आहे.