नीरज राऊत, लोकसत्ता 

पालघर: रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने एकात्मिक रस्ता अपघात संदर्भातील माहिती संकलित करण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. मात्र यामध्ये पोलीस, परिवहन, प्राधिकरण, आरोग्य विभागाची उदासीनता दिसत असल्यामुळे  माहिती संकलनात अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. त्यामुळे  महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रांची  माहिती संकलित करणे व त्यावर ठोस उपाय योजना राबविणे शक्य होत नसल्याचे  दिसून येत नाही. त्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांच्या जिवाला धोका कायम आहे.

pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही
13 Development Centers along Konkan Expressway, Sea Route
कोकण द्रुतगती महामार्ग, सागरी मार्गालगत १३ विकास केंद्रे; १०५ गावांसाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती
ambitious projects in Maharashtra
राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आचारसंहितेनंतरच सुरुवात? एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा खुल्या होणार

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने एकात्मिक रस्ता अपघात संदर्भात माहिती संकलित करण्यासाठी इंटिग्रेटेड रोड अ‍ॅक्सिडेंट डेटाबेस नामक उपक्रम हाती घेतला आहे.  त्यामध्ये झालेल्या अपघातांचा तपशील संकलित करण्यासाठी पोलीस, वाहतूक (परिवहन), राष्ट्रीय महामार्ग/सार्वजनिक बांधकाम विभाग व आरोग्य विभागांची मदत घेण्याचे योजिले आहे.

अपघात झालेल्या ठिकाणाचा तपशील पोलीस विभाग, अपघातग्रस्त वाहनांची तपासणी परिवहन विभाग, अपघातामागील तांत्रिक कारणांचा अभ्यास सार्वजनिक बांधकाम अथवा महामार्ग विभाग तर अपघातांमध्ये जखमी व मृत  प्रवाशांची माहिती आरोग्य विभागाने संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या प्रक्रियेत सध्या उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत खासगी रुग्णालय व आस्थापने यांचा समावेश नाही. त्यामुळे अपघातांसंदर्भातील माहिती अपूर्ण राहण्याची अथवा दडवली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हाधिकारी रुग्णालय येथील कर्मचाऱ्यांना या प्रणालीमध्ये माहिती संकलित करण्यासाठी ७ डिसेंबर रोजी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन केले असले, तरीही त्यामध्ये या मार्गावरील खासगी रुग्णालयांचा समावेश केला गेला नसल्याचे दिसून आले आहे.

सन २०२१ मध्ये  राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची माहिती संकलित करून अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी या प्रणालीत प्राप्त होणारी माहिती आयआयटी चेन्नई व जिल्हास्तरीय संगणक विभागाकडून गोळा करून पृथ्थकरण करण्यासाठी पाठवण्यात येत आहे.

या प्रणालीमध्ये तपशील नोंदवण्यास पोलीस विभागाने आरंभ केला असला, तरीही आरोग्य परिवहन, सार्वजनिक बांधकाम किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांकडून माहिती संकलित करण्याबाबत अजूनही विशेष लक्ष दिले जात नसल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रणालीमध्ये माहिती नोंदवण्यासाठी सर्व विभागाने पुढे यावे, अशी अपेक्षा केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे.

प्राधिकरणाच्या रुग्णवाहिका खासगी रुग्णालयांशी संलग्न

उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर   राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.  खासदार राजेंद्र गावित व जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत  आपत्कालीन परिस्थितीसाठी कार्यान्वित  रुग्णवाहिकांबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सध्या मनोर टोलनाक्याजवळ कार्यरत असणाऱ्या रुग्णवाहिकांना ओळख पटण्यासाठी विशिष्ट रंग व पट्टे लावण्यात आले असले तरीही ही रुग्णवाहिकास कार्यरत ठेवण्यासाठी एका खासगी रुग्णालयाची मदत घेतल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्याऐवजी खासगी रुग्णालयात घेऊन जात असल्याने अपघाताबद्दलची माहिती दडविण्यासाठी नवीन पद्धत विकसित केल्याची माहिती पुढे आली आहे. एकीकडे रुग्णवाहिकांना महामार्ग प्राधिकरणाने विशिष्ट रंगाचे पट्टे लावण्याचे बंधनकारक केले असताना अपघात समयी कार्यरत असणारे क्रेन व इतर साहित्याला असेच रंग का लावले जात नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अपघातांचे ठिकाण बदलण्यासाठी संगनमत

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी तसेच रुंदीकरणाच्या दृष्टिकोनातून टोल आकारणी करण्यात येत असली तरी या महामार्गावरील राज्यातील भागात अनेक ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. या महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्राची माहिती लपवण्यासाठी पोलिसांची अप्रत्यक्ष मदत घेऊन अपघातांचे ठिकाण बदलले जात असल्याचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे केंद्र शासनाने अमलात आणलेली अपघातांची माहिती संकलित करण्याची प्रणाली कितपत कार्यक्षम राहील याबद्दल देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.