दुरुस्तीच्या मंजुरीनंतरही रस्ते खड्डेमय

पालघर नगरपरिषद हद्दीमधील रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्तीसाठी नगरपरिषदेच्या सभेमध्ये मंजुरी मिळालेली असताना हे काम सुरू झालेले नाही.

पालघर नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

पालघर : पालघर नगरपरिषद हद्दीमधील रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्तीसाठी नगरपरिषदेच्या सभेमध्ये मंजुरी मिळालेली असताना हे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे खड्डेमय रस्त्यावरून नागरिकांचा त्रासदायक प्रवास आजही सुरूच आहे. सुमारे नऊ लाख पन्नास हजार रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतरही रस्त्यावरील खड्डे कायम आहेत.

नगर परिषद हद्दीतील रस्त्यांवर ठिकाणी खड्डय़ांचे व मोठमोठय़ा खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. यावरून वाहने नेताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. खड्डय़ातील खडी रस्त्यावर पसरल्यामुळे या खडीमय रस्त्यावरून नागरिकांना चालत जावे लागत आहे. 

पालघर शहरातील वाहतूक कोंडी होणाऱ्या जगदंबा हॉटेल ( वसंतराव नाईक चौक), धडा रुग्णालय, आंबेडकर चौक या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. त्यानंतर पावसाचे कारण देत यावर खडी मातीचा मुलामा नगरपरिषदेमार्फत देण्यात आला. हा तकलादू मुलामा पावसाळ्यानंतर संपूर्णत: उखडला व खड्डय़ातील मोठी खडी रस्त्यावर पसरू लागली. याबाबत नगरपरिषदेचे पदाधिकारी व प्रशासन यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही आजही रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. त्यामुळे या खड्डेमय व खडीमय रस्त्यावरून नागरिकांचा जीव घेणारा प्रवास सुरूच आहे.   लाखो रुपये खर्च करून रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम नगरपरिषद दर वर्षी करीत असते. या कामावर अभियंते व अधिकारीवर्गाचे लक्ष नसल्यामुळे ठेकेदार तकलादू कामे करीत आहे. वाहनचालकांचा सह पादचारी नागरिकांना या रस्त्यावरून चालताना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते त्यामुळे तातडीने नगर परिषदेने रस्त्यावरील  खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.

रस्त्यावरील खड्डे व पसरलेली खडी यामुळे चालकांची होणारी गैरसोय लक्षात घेता यंत्रणेकडे व अधिकारी वर्गाकडे तगादा लावून हे काम करण्यास सांगतो.लवकरच खड्डे बुजविले जातील असे प्रयत्न केले जातील.

भावानंद संखे, पक्षनेते, पालघर नगरपरिषद

खड्डे बुजविण्याच्या निविदा कामाची प्रक्रिया सुरू आहे. येत्या आठ दिवसांत आदेश देऊन काम सुरू  होईल. रस्त्यावरील खडी बाजूला केली जाईल.

इंद्रजित सूर्यराव, नगर अभियंता, पालघर नगरपरिषद

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Roads paved repair approval ysh

ताज्या बातम्या