निखिल मेस्त्री
पालघर : पालघर जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी मोफत आरोग्य व्यवस्था बळकटीकरण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. मात्र काही शासकीय रुग्णालयांकडून नि:शुल्क असलेल्या औषधोपचारांसाठी रुग्णांकडून पैसे आकारून त्यांची लूट सुरू आहे. यावरून शासकीय आरोग्य व्यवस्थेमध्ये असलेला गैरव्यवहार, अनियमितता समोर येते आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेत असलेल्या एका महिला रुग्णाच्यामागे इंजेक्शनसाठी पाचशे रुपयांसाठी तगादा लावणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यावरून आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांच्या लुटीचे उदाहरण समोर येत आहे. काही वर्षांपूर्वी मासवण आरोग्य केंद्रातही असाच काहीसा प्रकार उघडकीस आला होता. इंजेक्शन दिल्यानंतर एका पेटीमध्ये दहा ते वीस रुपये ठेवण्याचा तगादा लावला जात होता. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्यावेळी हा प्रकार रंगेहाथ पकडला होता. अशाच प्रकारे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गत येणाऱ्या काही रुग्णालयांमध्ये अज्ञान रुग्णांची लूट सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काही रुग्णालयांमध्ये महागडी औषधे, इंजेक्शन मोफत उपलब्ध असली तरी त्या औषधांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत रुग्णांकडून पैशाचा तगादा लावला जातो. याचबरोबरीने लहान मध्यम स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करतानाही पैशांचा तगादा लावला गेल्याच्या तक्रारी ऐकिवात आहेत. पालघर तालुक्यात अजूनही काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असा प्रकार सर्रास सुरू आहे. यानंतरही आरोग्य यंत्रणेला याची माहिती नाही किंवा अशा प्रकारांना शोधून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे औदार्य दाखवले जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होते.
ज्या गोरगरीब रुग्णांसाठी ही आरोग्य केंद्रे, रुग्णालये व त्यातील आरोग्यसेवा शासनाकडून मोफत उपलब्ध करून दिली जात आहेत. मात्र अशा रुग्णांकडून विविध कारणे सांगून बेकायदा पैसे उकळले जातात. त्यामुळे मोफत आरोग्य सेवेच्या मूळ उद्दिष्टाला हरताळ फासला जात आहे. त्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
औषधोपचारासाठी जिल्ह्याच्या बाहेर रुग्णांना जाणे जिकरीचे ठरते. त्यासाठी स्थानिक स्तरावर आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी कोटय़वधींचा निधी शासनामार्फत दिला जातो. आरोग्यसेवा बळकट झाल्या असल्या तरी सरकारी आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे. तसेच अपुऱ्या सेवा साधनांअभावी रुग्ण मुंबई किंवा गुजरातेकडे उपचाराकरता वळत आहेत.
आरोग्य विभागाचे आवाहन
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत असलेले काही वैद्यकीय अधिकारी-कर्मचारीच रुग्णांची लूट करून आरोग्य व्यवस्था पोखरण्याचे काम करत आहेत. अशांनी औषधे व उपचारासाठी पैसे मागितल्यास ते देऊ नयेत व त्यांच्या विरोधात तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे लेखी किंवा dhopalghar@gmail या मेलवर तक्रारी पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय रुग्णालयात उपचार व औषधे यासाठी पैसे लागत नाहीत. ही सेवा सर्वासाठी नि:शुल्क आहे. पैसे मागितल्यास देऊ नये किंवा पैसे मागणाऱ्या विरोधात तक्रार करावी, असे आवाहन आहे. -डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. पालघर