पालघर : आर्थिकदृष्ट्या मागास आणि वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के विनामूल्य प्रवेशाची प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पालघर जिल्ह्यातील शाळा नोंदणीची प्रक्रिया ३१ जानेवारी रोजी पूर्ण झाली असून, जिल्ह्यातील २६८ शाळांमधील ५,६२२ जागांसाठी यंदा ऑनलाईन सोडत (लॉटरी) काढली जाणार आहे.

गेल्या वर्षीच्या २०२५-२६ तुलनेत यंदा शाळा नोंदणीत किंचित घट झाली असली, तरी उपलब्ध जागांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी २७२ शाळांमध्ये ५,०७२ जागा उपलब्ध होत्या, तर यंदा ५,६२२ जागा उपलब्ध आहेत. या प्रक्रियेत सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांचा समावेश आहे. मात्र, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त, अनधिकृत आणि स्थलांतरित शाळांना यातून वगळण्यात आले आहे.

मागील वर्षी प्रमाणे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत काही महत्त्वाच्या बदलांसह नवीन कागदपत्रांची भर पडली आहे. ज्या बालकांच्या पालकांचा (एक किंवा दोन्ही) मृत्यू १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या काळात कोव्हिडमुळे झाला आहे, त्यांना ‘वंचित गट’ प्रवर्गात स्थान देण्यात आले आहे. यासाठी मृत्यू दाखल्यासोबतच रुग्णालयाचे कोव्हिड निदानाचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तसेच अनाथालयात राहणाऱ्या मुलांसाठी संस्थेची कागदपत्रे, तर बाहेर राहणाऱ्या मुलांसाठी त्यांचा सांभाळ करणाऱ्यांचे हमीपत्र ग्राह्य धरले जाईल. विशेष म्हणजे, अनाथ मुलांसाठी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. प्रवेशासाठी बालक आणि पालकांचे आधार कार्ड किंवा नोंदणी पावती आवश्यक आहे. आधार नसल्यास ९० दिवसांच्या आत ते सादर करण्याच्या अटीवर तात्पुरता प्रवेश दिला जाईल. मुदतीत आधार न दिल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो.

डहाणूमध्ये नर्सरीसाठी ६३ जागा

बहुतांश ठिकाणी पहिलीच्या प्रवेशासाठी प्रक्रिया राबवली जात असताना, डहाणू तालुक्यातील एका शाळेत पूर्व प्राथमिक (नर्सरी) स्तरावर ६३ विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.

पालकांना शिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन

ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. अर्जासोबत रहिवासी पुरावा, जन्माचा दाखला, वडिलांच्या उत्पन्नाचा दाखला (आर्थिक दुर्बल घटकांसाठी) आणि अपंग असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र ही कागदपत्रे तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिकाधिक पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पालक जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.zppalghar.gov.in) भेट देऊ शकतात.