कासा : गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल दरामध्ये सतत वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता होरपळून निघाली आहे. पालघर जिल्ह्यातील सीमेलगत असलेल्या गुजरात राज्यात इंधन स्वस्त मिळत असल्यामुळे सीमेवरील तालुक्यातील वाहनचालकांनी गुजरातच्या पेट्रोलपंपावर धाव घेत आहेत.
पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, जव्हार या तालुक्याना लागूनच गुजरात राज्य, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची सीमा आहे. गुजरात राज्यात पेट्रोल १४ रुपयांनी तर दादरा नगर हवेलीमध्ये १७ रुपयांनी स्वस्त आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर पालघर जिल्ह्यात पेट्रोलचे दर ११९ रु. प्रतिलिटर झाले आहेत. त्यामानाने गुजरात राज्यात हे दर १०४ प्रतिलिटर व दादरा नगर हवेलीमध्ये १०२ रु. प्रति लिटर आहे. गुजरातमधील पेट्रोल पंप केंद्रांनी वाहनचालकांनी गुजरातमध्येच वाहनात इंधन भरावे यासाठी गुजरात आणि महाराष्ट्र यामधील इंधनातील तफावत दाखवणारे मोठमोठे फलक लावले आहेत.
त्यामुळे बरेचसे नागरिक गुजरात, दादरा नगर हवेली या भागांत पेट्रोल भरायला जात आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या सीमाभागातील पंपांवरील पेट्रोल विक्रीवर परिणाम होताना दिसून येत आहे. गुजरात राज्यातील उमरगाव , संजाण, भिलाड तर दादरा नगर हवेलीमधील नरोली, खानवेल या भागातील पंपावर महाराष्ट्रातील नागरिकांची इंधन भरण्यासाठी गर्दी होताना दिसून येत आहे.
महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचे दर गुजरातपेक्षा जास्त असल्यामुळे तलासरी तालुक्यातील बहुतांश वाहन मालक-चालक शेजारील गुजरात व दादरा नगर हवेली या भागात जात असल्यामुळे आमच्या पेट्रोल पंपावरील विक्री मोठय़ा प्रमाणात कमी झाली आहे. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या मजुरांचा पगार देणेही अवघड झाले आहे.-उमेश पटेल,पेट्रोल पंपचालक, तलासरी.