पालघर : सफाळे रेल्वे स्थानकाच्या परिसरात नागरिकांना उपनगरीय गाड्यांच्या फलाटावर पोहोचण्यासाठी सुविधा अपुऱ्या असल्याने अनेकदा प्रवाशांना गाडी खालून मार्ग काढणे अथवा डीएफसीसीचे रूळ ओलांडणे भाग पडत आहे. यामुळे अनेकदा अपघात झाले असून गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातात एका तरुणीला आपले दोन्ही पाय गमवावे लागल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पश्चिम रेल्वेने सफाळा रेल्वे स्थानकात भुयारी मार्ग उभारण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी व प्रवाशांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

सफाळा पूर्व व पश्चिमेच्या भागामध्ये रेल्वेने प्रवास करणारी मोठी लोकवस्ती असून सफाळा रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला उपनगरीय क्षेत्राच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून रेल्वे फलाटाच्या पूर्वेच्या बाजूला द्रुतगती मालवाहू लोहमार्ग कार्यरत आहे. प्रत्यक्षात उपनगरीय गाड्यांच्या रेल्वे फलाटावर पोहोचण्यासाठी असणाऱ्या भौतिक सुविधा अपुऱ्या असल्याने नागरिकांना अनेकदा रेल्वे रूळ ओलांडणे भाग पडत आहे

सफाळे रेल्वे स्थानकातील पूर्व-पश्चिम भागाला जोडण्यासाठी नवीन भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात यावी, या मागणीसाठी आज सफाळे रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

या संदर्भात स्थानिकांनी खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्याकडे अनेकदा निवेदन दिली असून या संदर्भात रेल्वे अधिकारी यांच्याशी चर्चा होऊन भुयारी मार्ग करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र प्रत्यक्षात या कामासाठी अनेकदा सर्वेक्षण झाले असले तरीही कामत प्रगती झाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. डीएफसीसी सुरु करण्याच्या प्रसंगी आश्वासन देणारी रेल्वे यंत्रणा नंतर शांत झाल्याचे आरोप होत आहेत.

पार्श्वभूमी

गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून सफाळे रेल्वे स्थानकातील पूर्व-पश्चिम ये-जा करण्यासाठी असलेले रेल्वे फाटक बंद करण्यात आले आहे. मात्र, फाटक बंद केल्यानंतर नागरिकांसाठी कोणताही सोयीस्कर पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. सध्या उपलब्ध असलेला पर्यायी मार्ग अतिशय लांब, वळणावळणाचा आणि उंच असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा वापर करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा मार्ग अत्यंत गैरसोयीचा ठरत आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी नागरिकांना मोठा वळसा घालावा लागत असल्याने वेळ आणि श्रम दोन्ही खर्च होत आहेत.

या समस्येबाबत यापूर्वीही अनेक वेळा आंदोलने, निवेदने आणि उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अद्याप या प्रश्नावर ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सफाळे रेल्वे स्थानकात पूर्व-पश्चिम जोडण्यासाठी कायमस्वरूपी आणि सुरक्षित भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

प्रवाशांसाठी पुरेशा पर्यायी सुविधा उपलब्ध

सफाळे रेल्वे स्थानकावरील लेव्हल क्रॉसिंग (LC) क्र. ४२ हे उड्डाणपूल (ROB) सुरू झाल्यानंतर ३१ मार्च २०२५ रोजी बंद करण्यात आले असून प्रवाशांच्या सोयीसाठी पुरेशा पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नव्याने सुरू करण्यात आलेल्या उड्डाणपुलावर (ROB) पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूंना पादचाऱ्यांसाठी जिन्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानकावरील सध्या अस्तित्वात असलेल्या पादचारी पुलावर (FOB) पूर्वेकडील बाजूला लिफ्ट, तर फलाट क्र. १ आणि २ वर सरकते जिने (Escalators) बसवण्यात आले आहेत. एमआरव्हिसीतर्फे दोन नवीन पादचारी पूल: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनतर्फे (MRVC) सफाळे स्थानकाच्या दोन्ही टोकांना दोन नवीन पादचारी पूल उभारले जात आहेत. यातील दक्षिण टोकाकडील पुलाचे काम प्रगतीपथावर असून पुढील दोन महिन्यांत ते पूर्ण होणे अपेक्षित आहे; तर उत्तर टोकाकडील पुलाच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे असे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या संदर्भात पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी (CPRO) भूमिका मांडली आहे.

भुयारी मार्गाची तांत्रिक अडचण

स्थानिक भौगोलिक आणि तांत्रिक मर्यादांमुळे सफाळे स्थानकावर भुयारी मार्ग (Subway) तयार करणे व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सफाळे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षित ये-जा करण्यासाठी सध्या पुरेशा पर्यायी पादचारी सुविधा उपलब्ध असून, भविष्यातील प्रवाशांची सुरक्षितता आणि कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी आणखी सुविधा वेगाने विकसित केल्या जात आहेत असे पश्चिम रेल्वे प्रशासनाने नमूद केले आहे.