पालघर : सातपाटी येथील सलीमा ज्वेलर्स या जवाहिऱ्याच्या व्यापाऱ्याने ग्राहकाने गेल्या तीन वर्षापासून दागिने घडवण्यासाठी दिलेले सोने व त्याकरिता दिलेल्या रोख रकमेच्या तुलनेत सुमारे तीन किलो सोने घेऊन गेल्या आठवड्यापासून पसार झाला होता. सातपाटी पोलिसांनी या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित ज्वेलरचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे.
सातपाटी येथील जुन्या बाजारपेठेच्या मार्गावर सुमारे पाच वर्षांपासून सलीमा ज्वेलर्स कार्यरत असून या जवाहिऱ्याच्या दुकानाचा मालक हा पालघर येथे सहकुटुंब राहत होता. काही ग्राहकांनी सोन्याचे दागिने घडवण्यासाठी स्वतःकडील सोने दिले होते तर इतर काही ग्राहकांनी तत्कालीन बाजारभावाप्रमाणे सोन्याची खरेदी करून दागिन्यांसाठी पैसे मोजले होते. गेल्या तीन वर्षांपासून काही ग्राहकांना आपले दागिने मिळत नसल्याने या प्रकरणात पाठपुरावा सुरू होता.
तीन महिन्यांपूर्वी सुमारे आठ-दहा ग्राहकांनी आपले दागिने संबंधित दुकानातून दिले जात नसल्याबद्दल पोलिसांसमोर या दुकानदाराला हजर केले असता त्यांनी पुढील काही महिन्यात सर्व ग्राहकांचे दागिने देण्याचे आश्वासन दिले होते. यावर समाधानी होऊन संबंधित ग्राहकाने पोलिसात तक्रार नोंदवली नव्हती असे सांगण्यात आले.
गेल्या आठवड्यात २० मे संबंधित दुकान मालक व त्याचे कुटुंबीय यांचा ठावठिकाणा नसल्याने ग्राहकांनी त्याचा प्राथमिक शोध घेतल्यानंतर सातपाटी सागरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली. गावातील सुमारे १२५ नागरिकांचे सोने अथवा रोख रक्कम संबंधित दुकानात जमा असून सुमारे तीन किलो सोन्याचे व रोख रकमेचा अपहर केल्याचा प्राथमिक अंदाज नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात सातपाटी सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता या प्रकरणात संबंधित ज्वेलरचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. पालघर न्यायालयाने त्याला ५ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याच्या पत्नीचा शोध पोलीस घेत आहेत. संबंधित ज्वेलर मालकाने नागरिकांकडून घेण्यात आलेले सोने परत मिळवण्याच्या दृष्टीने सातपाटी पोलीस चौकशी करीत आहेत.
