scorecardresearch

किनाऱ्यावर वाळू उपसा सुरूच

पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आदेश देऊनही पालघर जिल्ह्यात रेती उपसा सुरूच असल्याचे दिसून आले आहे.

पालकमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष; दिवसाढवळय़ा उत्खनन

पालघर : पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आदेश देऊनही पालघर जिल्ह्यात रेती उपसा सुरूच असल्याचे दिसून आले आहे. समुद्रकिनाऱ्यावर दिवसढवळय़ा रेती उपसा केला जात असून किनारे भकास होत चालले आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांनी अलीकडेच डहाणू दौरा केला होता. त्या वेळी आलेल्या तक्रारीवरून  जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील अवैध वाळू उपसावर लगाम घालण्याचे आदेश  प्रशासकीय अधिकाऱ्यांना  दिले होते. परंतु त्या आदेशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असून अधिकाऱ्यांनाही त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे.  पालकमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर त्यांची पाठ फिरताच  समद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा कब्जा केला आहे.  समुद्र किनाऱ्यावर चोरटी वाळू दिवसाढवळय़ा ओरबाडून नेली जात आहे. त्यामुळे किनारे ओस पडू लागली आहे. पर्यटकांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे. वाळू उपसामुळे किनारेही खचत चालले आहेत.  

जिल्ह्यातील डहाणू तालुक्याच्या समुद्रकिनाऱ्यावर बैलगाडी, पीकपद्वारे वाळू उत्खनन व तस्करी राजरोसपणे सुरू आहे. वाळू तस्करीमुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठमोठे खड्डे पडत असून पर्यटकांसह सकाळच्या प्रहरी फिरायला येणाऱ्या नागरिकांना तसेच क्रीडा सराव करणाऱ्या तरुणांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अलीकडेच प्रांत अधिकारी, तहसीलदार यांनी येथे धडक कारवाई केली होती. मात्र त्यानंतरही पहाटेच्या वेळी वाळू उत्खनन सुरू असल्याचे परिसरातील ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. वाळू उत्खननाचे गांभीर्य प्रशासनाला नाही. वाळू माफियांवर प्रशासन थातूरमातूर कारवाई करून त्यांना पुन्हा सोडून देत असल्याने वाळूमाफिया मोकाट सुटले आहेत. समुद्रकिनारे दोन ते तीन फूट खोल खणून त्यातून मोठय़ा प्रमाणात वाळू उपसा करण्याचे प्रकार बिनधास्तपणे सुरू आहेत. वाळू उत्खनन व तस्करी उघडपणे डोळय़ाने दिसत असतानाही महसूल व पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या अवैध व्यवसायामध्ये मोठय़ा प्रमाणात तरुण मंडळी गोवली जात आहे. वाळू माफिया व प्रशासनाचे आर्थिक हितसंबंध असल्याने वाळू माफियांवर योग्य ती कारवाई केली जात नसल्याचे आरोप येथील ग्रामस्थांकडून वेळोवेळी केली जात आहेत.

प्रशासनाची ढिलाई

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे येथील पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. अपरिमित वाळू उत्खननामुळे समुद्रकिनाऱ्यावरील हरित संपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याच बरोबरीने समुद्रकिनारे खचल्यामुळे समुद्राची पाणी थेट लगतच्या घरांमध्ये शिरून घरांचे मोठे नुकसान होत आहे, याचे तसूभरही गांभीर्य प्रशासनाला नाही. रोज सकाळी प्रभातफेरीसाठी येणाऱ्या नागरिकांसह ज्येष्ठांना या किनाऱ्यावरून चालणे जिकिरीचे ठरत आहे. हा किनारा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथे येणारे पर्यटकही किनारा विद्रूप पाहून हळहळ व्यक्त करीत आहेत.

बेकायदा कृत्यांना आळा घालणार

डहाणू तहसीलदार अभिजित देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. प्रांत अधिकारी यांनी वाळू उत्खननाबाबत प्रशासन गंभीर असून अशा बेकायदा कृत्यांना वेळीच आळा घातला जाईल. न्यायालयात असल्याने या विषयावर नंतर बोलता येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sand extraction continues shore excavation ysh