पालघर: डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीचे वादग्रस्त संरपंच कल्पेश धोडी यांच्यावर लाचखोरीच्या आरोपाचा ठपका ठेवत, कोकण विभागीय आयुक्तांनी त्यांना सरपंच पदावरून बाजूला करण्याचे आदेश दिले आहेत. 

पालघर लाचलुचपत विभागाने एका बांधकाम विकासकाकडून २० हजारांची लाच स्वीकारताना कल्पेश धोडी यांना १६ फेब्रुवारी रोजी पकडले होते. धोडी यांना लगेचच निलंबित करण्याची गरज असताना, पालघर जिल्हा प्रशासनाने मात्र निलंबनाचा प्रस्ताव कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठवला. जिल्हा प्रशासन या प्रकरणी वेळकाढूपणा करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते.

कोकण विभागीय आयुक्तांनी तब्बल पाच महिन्यानंतर आता निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय दिला आहे. परंतु सरपंचपद निलंबित करण्यात आले तरी धोडी यांचे मूळ सदस्यपद मात्र कायम आहे. त्यामुळे ही कारवाईसुद्धा एक फार्सच आहे की काय, अशी शंका चिंचणीवासीयांनी व्यक्त केली आहे.

उच्चस्तरीय चौकशीची मागणी

कल्पेश धोडी यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीच्या निधीमध्ये अफरातफर झाल्याचेही निदर्शनास आले होते. कल्पेश धोडी यांची पदभार स्वीकारल्यापासून ते निलंबनापर्यंतच्या केलेल्या सर्व कामांची तसेच ठराव, ग्रामपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या जावक क्रमांक नोंद वही, घरपट्टी नोंद वही यांची तपासणी, ग्रामपंचायतीला शासनाकडून आलेल्या निधीचा वापर यामध्ये अपहार झाल्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या सर्व कामांची उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.