पालघर : सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे सातपाटी गाव पावसाच्या पाण्याने वेढले गेले होते. पाऊस थांबताच हे पाणी ओसरले असले तरी जुलै महिन्याच्या मध्यावर येणाऱ्या पावसाळी उधाणा दरम्यान समुद्र पाण्याच्या भीतीने ग्रामस्थ ग्रासले आहेत.

गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे सातपाटी च्या दक्षिणेकडील तुफान पाडा व माळीवाडा परिसरातील पावसाचे पाणी सर्वोदय सोसायटी, श्रीराम मंदिर परिसरात शिरून हे पाणी शिवस्मारक व मार्केट मार्गे खाडीला मिसळले. त्यामुळे संपूर्ण परिसर व बाजारपेठ जलमय झाला होता. मुसळधार पावसाच्या वेळी समुद्राला भरती नसल्याने सातपाटी मधून वाहणाऱ्या पाण्याची पातळी नियंत्रित राहण्यास मदत झाली.

यंदाच्या हंगामात मे महिन्याच्या मध्यावर (१५ ते २०) तसेच जून महिन्यात (१ ते ३ व १३ ते १९) आलेल्या भरती दरम्यान पाच मीटर पेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. मात्र त्यावेळी पाऊस व वारा नसल्याने गावामध्ये उधाणाचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले नव्हते. पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवर १३ व १८ जुलै रोजी समुद्राला मोठी भरती येऊन ५.५० मीटर पेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार असल्याने आपली घरे सुरक्षित ठेवण्यासाठी मच्छीमारांनी किनाऱ्यावर सुरक्षित उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. सातपाटी येथील दांडीपाडा, शिवशक्ती मंडळ, कांती मंडळ परिसरातून समुद्री पाणी गावामधून शिरण्याची शक्यता असून त्यामुळे किनाऱ्यालगतच्या घरांना धोका असून किनारा परिसरातील घरांमध्ये समुद्राचे पाणी शिरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. समुद्रालगत उभारण्यात आलेले धूप प्रतिबंधक बंधारे ओलांडून समुद्राच्या लाटा घराला धडक देत असल्याने आपल्या घरात समुद्राचे पाणी घुसू नये या दृष्टीने मोठ्या दगडांच्या मदतीने अडथळे उभारले जात आहेत.

सातपाटी येथे मासेमारी बंदर उभारले जात असून या बंदरामुळे सातपाटी किनाऱ्याच्या काही भागाला समुद्री लाटांपासून संरक्षण मिळणार आहे. सातपाटी गावातील अधिकतर समुद्रकिनाऱ्यावर संरक्षक बंधारा उभारण्यात आला असला तरी लाटांच्या तडाख्यामुळे अनेक भागात बंधाऱ्याचा भाग कोसळल्याचे दिसून आले आहे. लोकप्रतिनिधी यांनी निधी उपलब्ध केला असला तरी बंधाऱ्याची तात्पुरती डागडुजी त्यामधून करण्यात आली आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत चालल्याने धूप प्रतिबंधक बंधारे उभारले असले तरी महाकाय लाटांच्या भीतीने किनारपट्टीवरील लोकांनी आपला घराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मोठे दगडे रचून समुद्राच्या लाटांच्या माऱ्यापासून वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

इतर किनाऱ्यानाही धोका

पालघर जिल्ह्याला ११२ किलोमीटरची किनारपट्टी लाभली असून अर्नाळा, एडवण, वडराई, शिरगाव, सातपाटी, नवापूर, उच्छेळी, दांडी, तारापूर, चिंचणी डहाणू व झाई किनाऱ्यावर असलेल्या मच्छीमारांच्या घरांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. प्रत्येक वर्षी किनारपट्टीवरील अनेक गावातील किनारपट्टीची धूप होऊन घरात पाणी शिरण्याचे, घरे कोसळण्याच्या घटना घडत आल्या आहेत. याचप्रमाणे किनाऱ्यावरील घरांची मोठ्या प्रमाणात धूप होत असून शासनाने या किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारे व इतर उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे.

धूप प्रतिबंधक बंधारा मान्यतेच्या प्रतीक्षेत

पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारा उभारण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी मिळाली असून या बंधाऱ्यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध होत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी पत्रकारांना सांगितले. असे बंधारे उभारण्यासाठी सागरी नियमन व परवानगी प्राप्त केल्या जात असून एमएसआरडी सी करून देखील बंधारे उभारले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सद्यस्थितीत हे प्रस्ताव विविध परवानगी व मान्यतेच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात आले.