दक्षता समितीकडून चौकशी सुरू

पालघर : भारत संचार निगम लिमिटेडच्या विविध दूरध्वनी केंद्रे व इतर ग्रुप टेलिफोन एक्स्चेंजमध्ये सुमारे दीड कोटी रुपयांचा भंगार साहित्य विक्री घोटाळा उघडकीस आला. परस्पर साहित्याची विक्री करून मिळालेल्या सुमारे दीड कोटी रुपयांबाबत संशय निर्माण झाला असून या प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरून उच्चस्तरीय दक्षता समिती चौकशी सुरू करण्यात आली आहे.

बीएसएनएलच्या कल्याण मंडळ क्षेत्रअंतर्गत पालघर व ठाणे जिल्ह्यातील सुमारे दीड कोटी रुपये किमतीच्या केबल, जनरेटर बॅटरी संच, स्क्रॅप केबल इतर महत्त्वपूर्ण पॅनलमधील उपकरणे याची परस्पर विक्री केल्याची तक्रार विक्रमगड येथील एका बीएसएनएल ग्राहकाने भारत संचार निगम लिमिटेडच्या मुख्य महाव्यवस्थापक तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती.

यामध्ये पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, खोडाळा, विक्रमगड, चारोटी, मनोर, वाडा, कुडूस यासह भिवंडी विभागातील अंबाडी, वज्रेश्वरी, दुगाडफाटा टेलिफोन एक्स्चेंज येथे विनावापर किंवा निरुपयोगी पडून असलेल्या अनेक महागडय़ा व महत्त्वपूर्ण साहित्याची भंगार साहित्याची परस्पर विक्री करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

नादुरुस्त किंवा किरकोळ खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्यातील भंगार दुरुस्ती करून अशा साहित्याचे नूतनीकरण करून पुनर्वापर केल्याचेदेखील आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये बीएसएनएलच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे सांगितले जात असून अशाच प्रकारे डिसेंबर २०१९ मध्ये दूरध्वनी केंद्रातील महत्त्वपूर्ण उपकरणे नादुरुस्त दाखवून भंगार म्हणून विक्री केल्याचेही आता आरोप होत आहेत.

या संदर्भात बीएसएनएलचे कल्याण परिमंडळ प्रमुख हरिओम सोळंकी तसेच मुंबई येथील बीएसएनएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर. के. शर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

नोंदणी आणि निविदा प्रक्रिया नाही

भंगार साहित्याची विक्री करताना खातेनिहाय विक्री प्रक्रियेनुसार भंगार साहित्याची अंदाजे किंमत ठरवणे, त्याची निविदा प्रक्रिया राबवणे, ठेकेदाराची नेमणूक करणे व विक्री करणे गरजेचे असते. परंतु बीएसएनलच्या भंगार विक्रीत अशी प्रक्रिया राबवली नसल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे या सर्व दूरध्वनी केंद्रांवर किती प्रमाणात भंगार साहित्य जमा झाले होते याची योग्य प्रकारे नोंदणी ठेवण्यात आली नाही. याचाच अर्थ हे काम करताना स्थानीय अधिकारी या गैरप्रकारात सहभागी असल्याचे तसेच मनमानी पद्धतीने काम केल्याचे स्पष्ट होत आहे, या संपूर्ण प्रकरणात मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे जयप्रकाश आळशी यांनी तक्रार दाखल केली आहे.