लोकसत्ता प्रतिनिधी
पालघर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अनेक कुटुंब शासनाच्या योजनांचा लाभ घेत असून अपात्र, दुबार, स्थलांतरित व मयत लाभार्थ्यांना वगळण्यासाठी शिधापत्रिकेची विशेष शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत शिधापत्रिकाधारकांनी आवश्यक पुरावे व हमीपत्र सह अर्ज ३० एप्रिल पर्यंत सादर करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
फेब्रुवारी २०१५ पासून राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ ची अंमलबजावणी सुरु झालेली असून त्यानुसार अन्नसुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अन्न योजना (AAY) व प्राधान्य कुटुंब योजना (PHH) अशा दोन गटात लाभार्थ्यांचे विभाजन करण्यात आलेले आहे. शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये लाभार्थी संख्या उदिष्ट पूर्ण झाल्यानंतर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अपात्र, दुबार, स्थलांतरीत, मयत लाभार्थ्यांना प्राथम्याने वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी जिल्हयात १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहिम राबविण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांची तपासणी करणेत येणार आहे. शिधापत्रिका धारकांनी फॉर्म मध्ये विचारलेली माहिती सोबत जोडलेल्या हमीपत्रासह भरुन द्यावयाची आहे. या शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येईल. फॉर्म भरुन देताना फॉर्म सोबत शिधापत्रिका धारकांनी ते ज्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. पुरावा म्हणून भाडे पावती, निवासस्थानाच्या मालकी बद्दलचा पुरावा, एलपीजी गॅस जोडणी क्रमांक बाबत पावती, बँक पासबुक, विजचे देयक, टेलिफोन, मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र (कार्यालयीन इतर) मतदार ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादी तसचे दिलेला वास्तव्याचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधी पेक्षा जुना नसावा असे नमूद करण्यात आले आहे.
उत्पन्नाचे निकषानुसार योजनेचा लाभ मिळत असल्याने कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गानी मिळणारे एकूण उत्पन्नाची नोद फॉर्म मध्ये करणे अपेक्षित असून ३० एप्रिल भरलेले फॉर्म दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच जमा केलेल्या अर्जाबाबत कार्यालयास पुढील कार्यवाही करण्याची मुदत ३१ मे अशी नेमून देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
अपात्र लाभार्थ्यांचा होणार पर्दाफाश
शासकीय सेवेत असणारे किंवा सधन कुटुंबातील अनेक कुटुंबीयांनी अन्नसुरक्षा कायदा अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी बनावट किंवा जुने उत्पन्नाचे दाखल्यांचा वापर केल्याचे प्रकार दिसून येत आहेत. आलिशान बंगले व गाड्यांमध्ये फिरणारी काही मंडळी देखील या योजनेचा लाभ घेत असल्याने गरीब व गरजू मंडळी शासकीय योजनेपासून वंचित राहताना दिसून येतात. विशेष म्हणजे शिधापत्रिका विभक्त केल्यानंतर नवीन विभक्त होणारा शिधापत्रिकाधारक अन्न सुरक्षा योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे दिसून आले आहे. शासनाने शिधापत्रिकाधारकांची पडताळणी काटेकोरपणे केल्यास अनेक गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
तालुका निहाय शिधापत्रिका धारक संख्या
पालघर :१,३७,८७८
वसई : ३,५८,०६५
डहाणू : ८८,७२८
वाडा : ३८,८८५
विक्रमगड : ३५,१६४
तलासरी : २८,१८४
जव्हार : ३४,८७८
मोखाडा : २०,८५४
एकूण : ७,४२,६३६