फटाक्यांचा कारखाना जळून खाक; कामगार जखमी, वाहनांचेही नुकसान

डहाणू/कासा/पालघर : डहाणू तालुक्यात फटाके उत्पादन करणाऱ्या कारखान्यात गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये एकामागून एक अनेक लहान-मोठे स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. या दुर्घटनेत आठ कामगार जखमी झाले असून त्यातील एक जण गंभीर आहे.

डहाणू तालुक्यातील डेहणे, पळे (पाटील पाडा) येथे असलेल्या विशाल फायर वर्क्‍स या फटाके उत्पादन करणाऱ्या  कारखान्यात हे स्फोट झाले. दहा किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरून या आगीचे लोळ  दिसत होते.  कारखान्यात वेल्डिंगचे काम सुरू असताना ठिणगी पडून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  आग लागल्यानंतर कंपनीतील फटाके व दारूगोळ्याचे मोठे स्फोट झाले. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की कंपनीचे पत्रे दूरवर उडाले. तसेच कंपनी परिसरात उभ्या असलेल्या पाच दुचाकी  दूरवर उडून त्यांचा चक्काचूर झाला. तर एक कार जळून खाक झाली. कंपनी परिसरातील चार शेडसह सुमारे एक एकर परिसर जळून खाक झाला आहे. एकापाठोपाठ होणाऱ्या स्फोटाच्या  आवाजाने २० ते २५ किलोमीटरचा परिसर हादरला, असे येथील स्थानिकांनी सांगितले. या कंपनीत ५० पेक्षा अधिक कामगार कारखान्यात काम करत असल्याची माहिती एका कामगाराने दिली.

स्फोटानंतर कंपनीतील काही कामगार वेळीच बाहेर पडल्याने ते बचावले. मात्र  १० कामगार आगीच्या संपर्कात येऊन भाजले व जखमी झाले. यातील एक  जण गंभीर जखमी आहे. त्याला गुजरात येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. इतरांवर डहाणू येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आग लागल्यानंतर तालुका प्रशासनासह अग्निशमन दलाच्या चार गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, शेजारील गावांतील घरांना तडे गेले.  या कारखान्याचे पत्रे दूर अंतरावर फेकले गेले आहेत. काही पत्रे तर थेट झाडावर अडकून राहिले आहेत. या आगीत कंपनी पूर्णत: जळून खाक झाली आहे.

जिल्हा प्रशासनाने या आगीच्या घटनेची चौकशी सुरू  केली आहे. तसेच कामगारांचे जबाब नोंदी घेण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

सुरक्षेकडे दुर्लक्ष

कारखान्यात मर्यादेपेक्षा जास्त स्फोटके असल्याचे सांगितले जाते. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने येथे कोणतीच उपाययोजना केली नसल्याचे येथील काही कामगारांनी म्हटले आहे.  ५०० किलोपेक्षा जास्त स्फोटके बाळगायची परवानगी असल्याचे सांगण्यात येते. मात्र आगीची व स्फोटाची तीव्रता लक्षात घेता परवानगीपेक्षा जास्त दारूगोळा होता का याची चौकशी केली जाणार आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.